भाजप खासदाराच्या टिप्पणीमुळे सोनिया गांधी भडकल्या

August 12, 2015 3:34 PM0 commentsViews:

SONIA IN LOKSABHA_new12 ऑगस्ट : लोकसभेत 14 दिवसांनंतर अखेर कोंडी फुटली असून ललितगेट प्रकरणावर चर्चा सुरू झालीये. पण या चर्चेदरम्यान एका भाजप खासदाराने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या बहिणीचा उल्लेख केल्याने काँग्रेस खासदार आक्रमक झाले. स्वतः सोनिया गांधींनी या टिप्पणीचा निषेध करत त्या देखील वेलमध्ये उतरून ‘तानाशाही नही चलेंगी’च्या घोषणा देऊ लागल्या.

आज लोकसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी प्रकरणावर चर्चा करण्यास तयार असल्याचं जाहीर केल्यानंतर स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी मोर्चा सांभाळत मोदी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी टीव्ही, रेडिओ आणि जाहिरातीत बोलतात पण या प्रकरणावर मौन धारुन करून आहे. सरकार अहंकारी असून सत्तेपुढं शहाणपण चालत नाही असा सल्लावजा टोला खरगेंनी लगावला.

खरगे यांनी ललितगेट प्रकरणात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा उल्लेख केला त्यामुळे भाजपच्या खासदारांनी कडाडून विरोध केला. राजेंवर बिनबुडाचे आरोप केले जात आहे. त्यांचा उल्लेख इथं केला जाऊ शकत नाही असा आक्षेप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केला. त्याचवेळी अलीगढचे भाजपचे खासदार सतीश यांनी थेट सोनिया गांधींवर टीका केली. सोनियांच्या बहिणीने ललित मोदींची भेट घेतली होती असा गंभीर आरोप केला. त्यामुळे सोनिया गांधी संतापल्या.

पहिल्यांदाच सोनिया गांधींनी आक्रमक होत वेलमध्ये उतरून आपला विरोध दर्शवला. त्यांच्यासह काँग्रेसचे इतर खासदारही वेलमध्ये उतरले आणि मोदी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली. सोनिया गांधींचा आक्रमकपणा पहिल्यांदाच लोकसभेत पाहण्यास मिळाला. काँग्रेसच्या खासदारांनी भाजपचे खासदार सतीश यांनी सोनियांची माफी मागावी अशी मागणी केली. अखेर या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close