दहशतवादी नावेदला पकडणार्‍या ‘त्या’ दोघांना पोलिसात नोकरी

August 12, 2015 4:06 PM0 commentsViews:

shaurya chakra jammu kashmir

12 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्याला जिवंत पकडणार्‍या ‘त्या’ दोघांची शौर्यपदकासाठी शिफारस करण्यात आली असून, या दोघांना पोलीस दलात नोकरी देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला करणार्‍या दोन दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं होतं. मोहम्मद नावेद ऊर्फ उस्मानला जिवंत पकडण्यासाठी राकेशकुमार आणि विक्रमजीत या दोन गावकर्‍यांनी जीवाची बाजी लावून पकडलं होतं. त्यामुळेच या गावकर्‍यांचा योग्य तो सन्मान व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेल्या निवेदनात व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी राज्य सरकारला निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी या दोघाही धाडसी गावकर्‍यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी शिफारस सरकारकडे केली आहे. या दोघांनाही तशी नेमणूक पत्रंही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, एनआयएचे प्रमुख आज जम्मूमध्ये भेट देणार आहेत. उस्मानची चौकशी ते स्वत: करणार असल्याचंही समजतंय. गेल्या आठवड्यात उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावरच्या हल्ल्यात उस्मानला पकडण्यात आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close