मायानगरीच्या किनार्‍यावर पैशांच्या लाटा!

August 12, 2015 11:01 PM0 commentsViews:

12 ऑगस्ट : मुंबईत पाण्यासारखा पैसा मिळतो असं म्हणतात. पण गेट वे ऑफ इंडियाजवळ चक्क पाण्यात पैसे सापडल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गेट वे ते रेडिओ क्लबजवळ मंगळवारी दुपारी समुद्रात हजार रुपयाच्या अनेक नोटा तरंगताना दिसल्या. पैशांच्या मोहापायी काही जणांनी गेट वे परिसरातील संरक्षक भिंत ओलांडून समुद्र किनार्‍याजवळ आलेल्या नोटा उचलायला सुरुवात केली. आणि बघता बघता ही बातमी वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे बघ्यांची तोबा गर्दी जमा झाली.

सुरुवातीला या नोटा खोट्या आहेत, असा गाजावाजा झाला. पण जेव्हा या नोटा पाण्यातून काढल्या तेव्हा त्या खर्‍या होत्या हे स्पष्ट झालं. थोड्याच वेळात ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आले आणि तरंगणार्‍या नोटा उचलणार्‍या सगळ्यांना ताब्यात घेतले. नोटा जप्त करण्यात आल्या आणि चौकशी सुरू झाली.

दरम्यान, ‘गेट वे’च्या संरक्षक भिंतीला धडकणार्‍या प्रत्येक लाटेसोबत हजाराच्या नोटा तरंगताना दिसत होत्या, अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. एवढ्या हजाराच्या नोटा आल्या कशा, याची चौकशी सुरू असून नोटा फेकणार्‍या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close