उस्मानाबादच्या दुर्दशेला राष्ट्रवादीच जबाबदार, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

August 14, 2015 5:53 PM0 commentsViews:

cm on media 345234

14 ऑगस्ट : उस्मानाबादमध्ये शेतकरी मोर्चा काढून सरकारवर टीकास्त्र सोडणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उस्मानाबादची जिल्हा बँक कोणी खाल्ली, उस्मानाबादच्या सूत गिरण्या कोणामुळे बंद पडल्या, उस्मानाबादच्या हक्काचे पाणी कोणी पळवले, याची उत्तरे राष्ट्रवादी काँग्रेसने द्यावीत आणि मग सरकारविरोधात मोर्चे काढावेत, असा प्रतिहल्ला फडणवीस यांनी केला. मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आमचे मंत्री आणि खासदार तिथे फिरताहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांनी काल (शुक्रवारी) उस्मानाबादमध्ये जाहीर सभेत केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर टीका केली होती. ज्यांच्या हातात सध्या सत्ता आहे. त्यांना गरिबांचे स्मरण नाही. सरकारला अजून सूर सापडलेला नाही, असं सांगत त्यांनी सरकारविरोधात पुढच्या महिन्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या या अवस्थेला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितलं.

संसदेच्या अधिवेशनात गोंधळ घालून कामकाज होऊ न दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. जीएसटी विधेयक रोखण्यासाठीच जाणीवपूर्वक हा गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप करून यामुळे काँग्रेस खासदार 44 वरून चार वर यायला वेळ लागणार नाही, असाही टोला त्यांनी लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close