पारधी समाज आजही बेड्यात अडकलेलाच !

August 15, 2015 3:27 PM0 commentsViews:

सागर सुरवसे, सोलापूर

15 ऑगस्ट : ग्रामीण भागात कुठेही मोठा दरोडा पडला की पोलीस पारध्यांच्या पालांवर धडपकड करतात. कोणतीही शहनिशा न करता पारधी बांधवांना उचललं जातं. आणि चोरींच्या खोट्या केसेसमध्ये तुरुंगात टाकलं जातं. ब्रिटीशांनी गुन्हेगारीचा शिक्का मारल्याने स्वतंत्र भारताचं पोलीस खातं आजही दरोडेखोर म्हणूनच वागवतंय.थोडक्यात कायतर देश स्वतंत्र होऊन 69 वर्षे लोटली तरी हा पारधी समाज आजही मुख्य प्रवाहापासून कोसोमैल दूर आहे….याबद्दलचा हा विशेष वृत्तांत…

barshi solapur43बार्शी तालुक्यातलं हत्तीस गाव आणि या आहेत पारधी वस्तीवरच्या इजाबाई शिंदे…इजाबाईंच्या पंप्या आणि टोम्या या दोन मुलांना पोलिसांनी अटक केलीय. यमगरवाडी परिसरातील वस्तीवर राहणार्‍या काशीबाई जोगदंड यांची हत्या केल्या प्रकरणी त्यांच्यावर मोक्का लावण्यात आलाय. तुरूंगात गेलेल्या दोघा भावांची थोडी थोडकी नव्हे तर दहा मुलं आहेत. मात्र, त्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणीच नाही. नवरा जेलमध्ये गेल्यानंतर एकाची पत्नी दुसर्‍याबरोबर पळून गेली तर दुसरीने मुलं-बाळं वार्‍यावर सोडून माहेरचा रस्ता धरला.

आता त्यांची दहाच्या दहा मुलं मोहोळमधील पारधी समाजाच्या आश्रमशाळेत शिकत आहेत. तिथेच त्यांची सर्व व्यवस्था केली जातेय. यापैकी सर्वात लहान मुलगी आहे तीला पोलीस व्हायचंय…

सोलापूर जिल्ह्यात 99 टक्के पारधी समाज हा रोजंदारीवर जगतो. पण केवळ काहीजणांमुळे अख्खा समाज बदनाम होतोय. म्हणूनच जे
चोर्‍या करतात त्यांच्यावर खुशाल गुन्हे दाखल करा पण निरपराध्यावर कारवाई करू नका, अशी कळकळीची विनंती पारधी समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले करतात.

गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने प्रशासनही पारधी समाजाला नेहमीच पाण्यात बघतं. उत्तर सोलापूर तालुक्यातल्या कवठाळी गावातल्या पारधी बांधवांचा साधी रेशनकार्डही दिली जात नाहीयेत. त्यासाठी ते तब्बल 22 वर्षांपासून सरकारी कचेर्‍यांच्या खेटा मारत आहेत.
रेशनकार्ड नाही म्हणून मतदार यादीतही नाव नाही. आणि मतदार नाहीत म्हणून गावचे पुढारीही यांची दखल घेत नाहीत.

खरंतर सरकार पारधी समाजासाठी अनेक लाभदायी योजना सुरू केल्यात. पण स्वतंत्र भारतातही पारधीबांधवांना भारतीय असल्याची कागदोपत्री ओळख मिळत नाहीये. परिमाणी हा पालावरचा पारधी समाज खर्‍या स्वातंत्र्यापासून आजही कोसोमैल दूर आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close