शरद पवार ‘दिलीपकुमार’ तर पंकजा ‘दीपिका पदुकोण’

August 15, 2015 4:10 PM0 commentsViews:

15 ऑगस्ट : एकमेकांवर टीकेची एकही संधी न सोडणारे नेते जेव्हा एकाच मंचावर उपस्थित होता त्यावेळी साहजिकच एकमेकांवर काय टीका करणार याकडे कान टवकारली जातात. आणि लातूरमध्ये घडलंही तसंच…शरद पवार हे राजकारणातले दिलीपकुमार आहे अशी उपाधीच पंकजा मुंडे यांनी दिली. मग काय, शरद पवारांनीही आपल्या अनुभवाची झलक दाखवत “पंकजा मुंडे या राजकारणातल्या दीपिका पदुकोण आहे” असं सांगत चांगलाच टोला लगावला.

pawar vs pankaja 34आज (शनिवारी) लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. लातूर झेपीच्या आवारात विलासरावांचा 12 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात राजकारणातली नव्या पिढीची पंकजा मुंडे आणि जुन्या पिढीचे जुनेजानते नेते शरद पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. सिनेमात जसं दिलीपकुमार यांच्या नावाचं स्टेट्स आहे तसंच राजकारणात शरद पवारांचं आहे अशी उपाधीच पंकजा मुंडेंनी पवारांना देऊ केली. पंकजा मुंडेंनी दिलीपकुमार उपाधी दिल्यामुळे सभामंडपात एकच हश्या पिकली. आता पंकजा मुंडेंनी दिलीपकुमार उल्लेख केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणात पंकजांना आपल्या अनुभवाची झलकच दाखवून दिली. पवार म्हणतात, “महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या सदस्या आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचा उल्लेख काय करू असा प्रश्न मला पडला. त्यांनी माझा उल्लेख दिलीपकुमार म्हणून केला. आता मी काही सिनेमा बघत नाही. त्यामुळे सिनेसृष्टीत लोकप्रिय कोण आहे हे मला माहित नाही. माझं अज्ञान राहू नये म्हणून मी रितेश देशमुखला बोलावून घेतलं. त्याला विचारलं की, हल्ली लोकप्रिय कोण ?, तर मीच सांगितलं माधुरी दीक्षित असेल. पण, तो म्हणे ही जुनीपिढी झाली आता दीपिका पदुकोण आहे. त्यामुळे आता जुन्यापिढीचा दिलीपकुमार इथं आला असेल तर नव्या पिढीची दीपिका आली. आता पंकजा मुंडेंचा उल्लेख दीपिका असा केला तर काही चुकणार नाही असा खुसखुशीत टोला पवारांनी लगावताच सभामंडपात एकच टाळ्या आणि हश्या पिकल्या. एक दिग्गज नेता काय असतो हेच पवारांनी यावेळी दाखवून दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close