सत्यवान, पूजा आणि ज्ञानेश्वर…एका ‘पारधी’ची पुन्हा तिच कहाणी !

August 15, 2015 7:50 PM0 commentsViews:

सागर सुरवसे, सोलापूर

15 ऑगस्ट : गावाबाहेर राहणारा फासेपारधी समाज…शिक्षण घेऊन मोठं व्हायचं या समाजातल्या अनेकांचं स्वप्नं आहे. पण हे स्वप्नं पाहण्याचं स्वातंत्र्य अजूनही या समाजातल्या मुलांना मिळत नाहीये.

हा आहे फासे पारधी समजातील सुशिक्षित सत्यवान भोसले. 12 वी पर्यंत याचं शिक्षण झालंय. शिक्षण असल्यामुळे सत्यवानचं लग्नं तर जुळलं पण नोकरी मात्र नाही. कारण आदिवासांसाठी असलेल्या आरक्षणात पारध्यांना कुठेच स्थान नाही. त्यामुळे शिक्षण घेऊनही सत्यवानाचं पोट शिकारीवरच अवलंबून आहे.

pardi news3सत्यवानच्या बरोबरीनंच राहणारे त्याचे भाऊही 12वी पर्यंत शिकलेले आहेत. परिस्थितीमुळे त्यांना पुढचं शिक्षण घेता येत नाहीये. पारधी असल्यानं खोट्या केस दाखल झाल्यात. सरकारी नोकरीचा मार्गही बंद झालाय. त्यामुळे शिकार करायची आणि कुटुंबाची खळगी भरायची हाच काय तो पर्याय.

हीच स्थिती बार्शी तालुक्यातल्या हात्तीज गावच्या पुजा शिंदेची. खरं तर नववीत असणार्‍या पूजाला खूप शिकायचंय…मोठं व्हायचंय…पण मात्र जातीच्या दाखल्या अभावी तिला शाळेत शिष्यवृत्ती मिळत नाहीये आणि वडील नसल्यानं आपलं पुढचं शिक्षण कसं होणार हा प्रश्न पूजाला सतायवतोय.

पूजाची आई ताई शिंदे…पूजाच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यामुळे पूजा, तिच्या भावाचं शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबादारी सगळं ताईंवरच आहे.

पूजा, सत्यवानसारखे अनेक उघड्यावरचे संसार पाहून ज्ञानेश्वर भोसले यांनी पुढाकार घेतला. या अनाथ मुलांना गुन्हेगारीच्या वातावरणापासून दूर नेण्यासाठी भारतमाता पारधी विकास संस्था सुरू केली. या संस्थेला अजूनही कोणतंही सरकारी अनुदान मिळत नाही. या आश्रमात जवळपास 120 मुलं राहतात. या आश्रमाचा महिन्याचा खर्च जवळपास 70 हजारांच्या आसपास आहे.

या संस्थेच्या माध्यमातून काम करताना भोसले यांच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे भोसले यांना जवळपास एक वर्ष जेलमध्ये काढावं लागलं. मात्र, याच काळात त्यांनी जेलमध्ये पारधी समाजाच्या लोकांना एकत्र करून समाजाला चांगली दिशा देण्याचे काम सुरू केलं.

या पारधी आश्रमात तीन जिल्ह्यातील मुले शिकतात. यात कुणाचे वडिलाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत तर कुणाच्या वडिलांचा पोलिसांनीच ठेचून खून केलाय. तर कुणाच्या वडिलांना गावकर्‍यांनी मिळून मारलेय.

स्वातंत्र्य 68 वर्षांपूर्वी मिळालं…त्यानंतर आदिवासी जाती-जमाती, भटक्या विमुक्तांसाठी सरकारने अनेक योजना आणल्या. या योजना खरोखरच त्यांच्या पोहोचतील, त्यांचा फायदा त्यांना मिळेल, तेच असेल त्यांच्यासाठीचं खरं स्वातंत्र्य…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close