सरकार म्हणजे बोलाचीच कढी – शरद पवार

August 16, 2015 2:21 PM0 commentsViews:

sharad_pawar_on_sena

16 ऑगस्ट : बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, अशी बोचरी टीका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर केली. इतकंच नाही तर पंतप्रधान देशात असतील तर दुष्काळावर त्यांच्याशीही चर्चा करू, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. सरकारने 13 सप्टेंबरपर्यंत काही पावलं उचलली नाही तर त्यानंतर गुराढोरांसोबत जेलभरो आंदोलन करू, याचा पुनरुच्चार पवार यांनी केला.

दुष्काळ दौर्‍यावर असलेले शरद पवार आज परभणीत आहेत. आपल्या 48 वर्षांच्या सामाजिक आयुष्यात आपण परभणीत दुष्काळ बघितला नाही. तेव्हा परिस्थिती गंभीर आहे, असं पवार म्हणाले. 2 जूनला आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि परभणी, बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये स्थिती चांगली नाही. तेव्हा आताच उपाययोजना करायला हवी, असं आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं. पण, जून, जुलै आणि अर्धा ऑगस्ट संपला पण अजून काहीच उपाय योजना करण्यात आलेला नाही, असं पवार म्हणाले. कृत्रिम पावसाचा फारसा उपयोग होत नाही, असंही पवार यांनी सांगितलं.

कृषी मंत्रालयाचे नाव बदलून खरोखरच शेतकर्‍यांचे भलं होणार आहे का असा खोचक सवाल शरद पवार यांनी मोदी सरकारला विचारला आहे. दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटूनही त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.

पवार यांच्या मराठवाडा दौर्‍याचा आज चौथा दिवस आहे. सकाळी 9 च्या सुमाराला त्यांनी परळीत जाऊन वैद्यनाथचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते परभणीत गेले. तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर शेतकर्‍यांच्या सभेला संबोधित केलं.

15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी मंत्रालयाचे नामकरण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालस असं केलं होतं. यावरुन पवारांनी मोदींवर टीका केली. कृत्रिम पावसाचा काहीच उपयोग होत नसून आता पाऊस झाला नाही तर गंभीर प्रश्न निर्माण होईल. शेतीचे उत्पादनही घटेल, अशा परिस्थितीत सरकारने महिनाभरात मदत जाहीर करावी नाहीतर 14 सप्टेंबरपासून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी पुन्हा एकदा दिला आहे. शेतकर्‍यांना वर्षभर पुरेल एवढं काम द्यावं असंही त्यांनी सांगितलं.

कर्ज पुनर्गठनासंदर्भात असतील अर्थमंत्र्यांची भेट घेऊ, पंतप्रधान भारतात असतील तर त्यांचीही भेट घेऊ असा चिमटाही त्यांनी काढला. सर्व दुष्काळी भागाबाबत वेगळा विचार करण्याची गरज असून मराठवाडा, विदर्भ, सांगली, आटपाटी अशा प्रत्येक भागात वेगळी स्थिती आहे, पाऊस कमी तिथे पाणी आणायचं कुठून असा प्रश्नही त्यांनी विचारला. माणसं आणि पशूधन जगवण्याची चिंता आता सरकारनेच करावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close