ब्राह्मण असणे दोष आहे का?

August 18, 2015 9:02 PM23 commentsViews:

amit_modak_ibnlokmat- अमित मोडक , सीनिअर प्रोड्युसर, आयबीएन लोकमत 

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण काय जाहीर झालं? आणि त्याला विरोधाचं एक पेवच फुटलं. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देणे म्हणजे त्या पुरस्काराचा अवमान, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करण्यात आलं. जितेंद्र आव्हाडांनी सुरू केलेल्या या विरोधात मग पुरोगाम्यांनी उडी घेतली. बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला नाही तर आपलं पुरोगामित्व धोक्यात येईल की काय? अशा भीतीनं मग सगळ्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराला विरोध सुरू केला.

हा विरोध पुरंदरेंना आहे की ब्राह्मण बाबासाहेब पुरंदरेंना आहे? प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं झालं तर या विरोधाला जातिवादाची किनार आहे. बाबासाहेब पुरंदरेंचं ब्राह्मण असणं त्यांच्या आड आलं. बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना एवढा विरोध होतोय हे मान्य करावंच लागेल. पुरंदरेंचा सन्मान म्हणजे कुठल्यातरी दहशतवाद्याचा सत्कार असं वातावरण निर्माण करून स्वत:ला मराठा समाजाचं तारणहार समजणार्‍या संभाजी ब्रिगेडनं तोडफोड सुरू केली. राष्ट्रवादीसारख्या पक्षानं या विरोधाला खतपाणी घातलं आणि शरद पवारांसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राजकीय नेत्यानं कुठलीही ठोस भूमिका न घेऊन, या विरोधाला पाठिंबाच दिला.

पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात ब्राह्मण हे नवे अस्पृश्य आहेत का? ब्राह्मणांचा कुठलाही सत्कार आज महाराष्ट्राला मान्य नाही का? इतके वर्षं ब्राह्मणांनी वर्चस्व गाजवलं, त्याची चीड अशा मार्गांनी, अशा विरोधातून बाहेर येत आहे का? या प्रश्नांची चर्चा करणं, या प्रश्नांचा विचार करणं आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधाच्या नावाखाली कुठेतरी जातीय द्वेष पसरवला जातोय. जातीच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय.

आज कुठल्याही गोष्टीला विरोध केला किंवा समर्थन दिलं तर पहिले विरोध करणार्‍याची जात बघितली जाते आणि मग कोणी समर्थन दिलं की त्याची जात बघितली जाते. आणि एकदा जातीच्या आधारावर विरोध सुरू झाला की मग सर्व तर्क, वस्तुनिष्ठ प्रश्न निरर्थक ठरतात. विरोधाला किंवा समर्थनाला तर्काचा आधार देण्याची भानगडच उरत नाही. उरतो तो फक्त विरोध आणि तो विरोध विचारांना, व्यक्तीला असण्यापेक्षा तो विरोध उरतो तो ‘जाती’ला.

babasaheb purandare_blogमहाराष्ट्रात जातिवादाचं हे वाढतं पेव अत्यंत भयावह आहे. समाज जणू काही कोलमडण्याच्या स्थितीत उभा आहे. जातीच्या नावावर संघटना आणि मग त्या संघटनांना मिळणारा राजकीय पाठिंबा. आणि संघटना वाढण्यासाठी जातीला विरोध, हे अलीकडच्या काळातलं चित्र. पण त्याहूनही चिंताजनक म्हणजे ब्राह्मणांना होणारा वाढता विरोध. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा काय झाली, ते या पदासाठी लायक आहेत की नाही? त्यांची शैक्षणिक पात्रता काय? आजवरची राजकीय कारकीर्द कशी होती? हे सगळे प्रश्न बाजूला आणि पहिला आक्षेप आला तो म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री. इतकी जात आज आपल्यामध्ये भिनली आहे की माणूस आणि त्याचं कर्तृत्व दिसत नाही. दिसते ती त्या व्यक्तीची जात.

एकूण आज राज्यात ब्राह्मण द्वेष वाढतोय का? याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यानंतरचा विरोध, त्या विरोधाची भाषा, त्या विरोधाचा आवेश, त्यानंतर याचा अधिक गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झालीय. बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाला कुणी आक्षेप घेऊ शकतं तर ते म्हणजे इतिहासकार, इतिहासाचे अभ्यासक. त्यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा विरोध केला नाही. सामान्य व्यक्तीही आक्षेप नोंदवू शकतो, शंका उपस्थित करू शकतो. पण त्या आक्षेपांना, प्रश्नांना उत्तरं मिळाल्यानंतरही हेका कायम असेल तर त्याला काय म्हणावं? तेच नेमकं बाबासाहेब पुरंदरेंसोबत होतंय. विरोध करणार्‍यांच्या आक्षेपांना इतिहासकारांनी उत्तरं दिल्यानंतरही, विरोधक हेका सोडायला तयार नाहीत. आक्षेप खरे ठरवण्यासाठी भक्कम पुरावेही त्यांच्याकडे नाहीत. विरोधाला धार आहे ती फक्त ‘जाती’ची. बाबासाहेब इतके वर्षं शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करत होते तेव्हा का आक्षेप घेतला नाही? गावोगावी जेव्हा ‘जाणता राजा’चे प्रयोग होत होते, त्या प्रयोगांना हजारोंची गर्दी होत होती तेव्हा का आक्षेप घेतले नाहीत? तेव्हा का चुकीचा इतिहास सांगताय असं सांगून प्रयोग बंद पाडले नाहीत? आज ज्या गावांमध्ये पुरंदरेंच्या विरुद्ध मोहीम राबवून सह्या जमवल्या जातायत तेव्हा त्याच गावातल्या लोकांनी हा प्रयोग डोक्यावर घेतला होता आणि आता फक्त आणि फक्त जातीच्या नावावर पुरंदरेंविरोधात सह्या जमवल्या जातायत हे अत्यंत लज्जास्पद आहे.

आज सुरू असलेल्या विरोधाला राजकीय धार देखील आहे. पुरस्कार देणारा आणि घेणारा ब्रह्मण आहे हे कुठे तरी समाजमनावर भिनवण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार होतोय आणि त्यातून सत्तेपासून दूर गेलेला पक्ष सत्तेसाठी रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण या प्रयत्नात समाज उभा-आडवा दुभंगतोय, याची यांना जाणीव आहे का? समाजात उभी फूट पडतेय याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही? जितेंद्र आव्हाडांवर हल्ला झाल्यावर शरद पवार दुखावले जातात. राज्यात गुंडशाही माजतेय अशी त्यांना जाणीव होते. मग जेव्हा दादोजी कोंडदेवांचा पुतळा पाडला गेला? भांडारकरवर हल्ला झाला तेव्हा झुंडशाही नव्हती का? किंवा मग मराठ्यांच्या संघटनांनी केलेले हल्ले समाजमान्य आणि इतरांनी केलेले हल्ले म्हणजे गुंडशाही का?

सातत्यानं ब्राह्मण समाजाला टार्गेट करून त्यांना वेगळं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. नव्हे तर ब्राह्मण म्हणजे नवे अस्पृश्य ठरतायत आणि जितके राजकीय पक्ष यासाठी जबाबदार आहेत तेवढेच तथाकथित पुरोगामीही जबाबदार आहेत. त्यामुळेच एखादा संपादक जेव्हा थेट म्हणतो की दाभोलकरांचा खून ब्राह्मणांनी केला तेव्हा चिंता वाटते. अशा प्रकारचं टोकाचं मत तुम्ही दुसर्‍या कुठल्याही धर्माबद्दल किंवा जातीबद्दल देणार नाही. ब्राह्मण आज सॉफ्ट टार्गेट ठरतायत, अशी भावना या समाजाच्या मनात घर करत आहे. त्यामुळेच कालपर्यंत तोडफोडीची मक्तेदारी असलेल्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना ब्राह्मण युवकही स्थापन करतायत आणि मग त्यातूनच जितेंद्र आव्हाडांवर हल्लाही केला जातो.

babasaheb_purandarephotoआज मोठ्या मिजाशीत मराठा संघटना आणि मराठ्यांचं प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष बाबासाहेब पुरंदरेंना विरोध करतायत. पण सगळेच मराठे का शिवाजींच्या बाजूनं होते? मराठ्यांनीही शिवाजी महाराजांचा विरोध केलाय? मराठे जसे शिवाजी महाराजांसोबत लढले तसे काही मराठी विरोधातही लढले, हे देखील सत्य आहे. शिवाजींना विरोध करणारे मराठे याबाबत का बोललं जात नाही? दुसरीकडे शिवाजींच्या राज्याभिषेकाला नकार देणारा ब्राह्मणाचा इतिहास ठासून सांगितला जातो. पण त्याच वेळी अनेक ब्राह्मण महाराजांसोबत लढले. बाजी प्रभूंचा इतिहास दुय्यम आणि गागाभट्टांचा इतिहास ठासून सांगायचा हे योग्य आहे का? यामधून ब्राह्मणाबद्दलाचा द्वेष वाढवायचा प्रयत्न करण्यात येत नाही का? शिवाजी महाराजांची ओळख महाराष्ट्राला खर्‍या अर्थानं कुणी करून दिली तर ती म्हणजे महात्मा जोतिबा फुलेंनी. ज्या महाराष्ट्राला शिवाजींचा विसर पडला होता ते शिवाजी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचं प्रतीक झालं ते महात्मा फुले यांच्यामुळे.

तर दुसरीकडे बाबासाहेब पुरंदरेंनी आपलं अख्खं आयुष्य शिवरायांसाठी वाहून घेतलं आणि त्यांच्यापरीनं त्यांनी शिवाजी महाराष्ट्रात पोहोचवला. आज एवढा शिवाजींचा जयघोष करणार्‍या मराठा समाजानं काय केलं? इतकी वर्षं राज्यात मराठ्यांची सत्ता आहे, आज बाबासाहेब पुरंदरेंच्या नावानं गळा काढणारे नेते इतके वर्षं सत्तेत असूनही महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी काही केलं नाही. सत्ता असून महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करू शकले नाहीत. संवर्धनासाठी निधी मिळावा म्हणून मराठा मंत्र्यांचे उंबरठे झिजवावे लागले. शिवाजींवर राष्ट्रवादीचं एवढं प्रेम आहे तर मग गडकिल्ले का वाचवता आले नाहीत. तेव्हा महाराज का आठवले नाहीत? पण स्वत:च्या नावापुढे ब्रिगेड लावणार्‍या संघटना असे प्रश्न विचारणार नाही. कारण त्यांनी फक्त महाराजांच्या नावावर राजकारण केलं, समाजकारण नव्हे.

बाबासाहेब पुरंदरे फक्त निमित्त आहे, समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न होतोय. पण राजकीय फयद्यासाठी पुरंदरेंसारख्या वयोवृद्ध व्यक्तीचा असा उद्धार करणं लाजिरवाणं आहे. बरं या विरोधामधला आणखी एक विरोधाभास. आंबेडकरी जनतेनं बाबासाहेब पुरंदरेंचा खूप आधी विरोध केला होता. त्यावेळी त्या विरोधाचंही ‘जाती’यकरण करण्यात आलं होतं. आंबेडकरी जनतेनं केलेल्या विरोधाला, दलितांचा विरोध असं लेबल लावण्यात आलं. आणि आज मराठे करत असलेला विरोध अचानक पुरोगामी कसा ठरतो? म्हणजे दलित विरोध करत असतीलं तर त्यांना जातीवादी ठरवण्यात येतं. त्यांच्यावर ब्राह्मण द्वेषाचा ठपका ठेवण्यात येतो. आणि मराठ्यांचा विरोध म्हणजे पुरोगामी भूमिका हा कसला न्याय? ज्या ब्राह्मण द्वेषाचा फायदा घेऊन दलित संघटनांना, आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करणार्‍या मराठा नेत्यांना आणि मराठा संघटनांना माझा एकच प्रश्न आहे. दलितांवर सर्वाधिक अत्याचार कोणी केले? आजही गावागावांमध्ये दलितांवर अन्याय करण्यात कुठल्या समाजाचा पुढाकार आहे? आणि जेंव्हा दलित विरुद्ध मराठा असा संघर्ष असतो तेंव्हा हे पुरोगामी मराठे कुठे लपून बसतात?

ब्राह्मणांबद्दल आज समाजात जो राग आहे त्याचा विचारही या समाजानं केला पाहिजे. जातीय समाजरचना निर्माण करणं, त्या जाती समाजात भिनवणं याची जबाबदारी ब्राह्मण समाजाला घ्यावी लागेल. इतकी वर्षं ज्या समाजावर अन्याय झाला, ज्यांना वाळीत टाकण्यात आलं. आज ब्राह्मणांना होणारा विरोध, याला कारण तात्कालिक असलं तरी त्यामागे हजारो वर्षं अन्याय झाला ही भावना आहे. शेकडो वर्षं ब्राह्मणांनी जातीच्या आधारावर बहुजन समाजाचं कर्तृत्व नाकारलं. आता त्याचीच पुनरावृत्ती होतेय. आता बहुजन समाज ब्राह्मणांचं कर्तृत्व नाकारतोय. हजारो वर्षं ब्राह्मणांनी समाज त्यांना हवा तसा चालवला. त्यामुळे आता बहुजनांना ब्राह्मण मुख्यमंत्री खटकतोय.

ब्राह्मणांमध्ये आज कॉर्नर केल्याची भावना आहे. पण आपणही कधीकाळी बहुजनांना कॉर्नर केलं होतं याची आठवण ब्राह्मणांना ठेवावी लागेल. समाजात दुफळी निर्माण करणार्‍या समाजरचनेचा पुरस्कार करून ब्राह्मणांनी इतकी वर्षं फळं चाखली, आता फक्त ती समाजरचना तुमच्यावर उलटतेय एवढंच. त्यामुळे ब्राह्मण समाजानं हा विरोध, हा तिरस्कार कसा दूर करता येईल याचा गांभीर्यानं विचार करावा. अन्यायग्रस्त समाजाची चीड, राग-द्वेष तुम्हाला समजून घ्यावाच लागेल. त्यानंतर पुढाकार घेऊन सामंजस्यानंच ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न ब्राह्मण समाजालाच करावा लागेल. हिंदू धर्मांत जातीय उतरंड कुणी आणली? बहुजनांचा शिक्षणाचा अधिकार कुणी काढून घेतला? अस्पृश्यता भारतीय समाजात कुणी आणली? या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर ब्राह्मणांना आज होणार्‍या विरोधाचं उत्तरही मिळेल.

ब्राह्मण समाजाबद्दलच्या या रागाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडला पाहिजे. कुठल्याही व्यक्तीच्या योगदानाची दखल, त्याच्या जातीमुळे विसरणं महाराष्ट्राला शोभणार नाही. बाबासाहेब पुरंदरेंच्या निमित्तानं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली समाजातली जातीय फूट वेळीच थांबवण्यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेत. आणि ते प्रयत्न तुम्हा-आम्हाला करावे लागतील, एवढं नक्की.

(हा ब्लॉग वाचून माझी जात शोधण्याचा प्रयत्न होणार नाही ही अपेक्षा)

अमित मोडक
E-mail : ammodak376@gmail.com
08879993608 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Chandrakant Gurav

  khup chan lekh ahe ya politicien walyanny maharashtra madhe jatibhed nirman klay he saglyani samajle pahije.konihi brahman nahi konihi bahujan nahi ani konihi marathe nahi ahet te sagle ” MAHARASHTRIAN ”

 • Gauri

  very well written article… both the groups brahman and non brahman have to behave responsibly … especially non brahmans (btw i am not a brahman)

 • Jai Maharashtra

  Amit Modak, Baman lokanni dalitana virodh kela, jaat samaj rachana keli, asprushata pasravli, pan tyat Maratha dwesh kuthe ahe? kuthlya marathyanna tyacha tras zhala? Marathe ta nehme rajya karte ahet, Pan brahamanancha sagyat jashta dwesh multaha marathe kartat asach sadhyacha chitra ahe, Baman lokanni maharashtra sodawa heyy mana pasna watta, karan baman jael tithe pragati karel heyy nakki..Maharashtra bakal zhalai, Gujrat, Madhyapradesh madhe nighun jawa

 • Revan Parkate

  the main question of maharashtra is solve the problems of farmers not castsm

 • Sidd

  Hindu nni ekatra yenyachi garaj ahe…

 • Mahesh Pathak

  je virodh karat ahet tyani tari wachale ahe kay sahitya? ani je rastyawar utrun jaalpol karat ahe tyana tari mahit ahe kay babasahebani kay lihile ahe te? wachale ahe kay tya lokani babasahebanche sahitya? babasahebani Shivaji Maharajanchya Itihasawar ghetleli mehnat hya konahi lokana disat nahi. khara problem brahmin ani brahmanetar asach ahe.

 • Mandar Patankar

  Modak. Lekh changla ahe. Pan shevti khatakla. Jyotiba Phule he Brahman dweshache Janak hot. Tyanni Shivrayanna Kulvadibhushan mhanun tynna khalchya patalila anle. Lokmanyanna Virodha hynchyach anuyayanni kela. Shivajayanti Kharya arthane lokmanyani suru keli. Peshwyanni suddha Thorle Bajirao Va Thorle Madhavrao ase adarsha Rajyakarte dile pan tyanche nav ka ghet nahit? Karan ithla majority Maratha samaj Brhaman dweshachya vyadhine grasta ahe Kruthagna ahe. He katu asle tari satya ahe. Ambedkaranche hi hya samajabaddal changle mat navte. Bapal shivya ghalta yet nahit mhanun he Maharajanche nav ghetat.

 • rakesh krishna pawar

  MODAK sir ekdam mast fatkarlay hya jatiya wadyana tumhi.

 • vertex_speed

  चौफेर फटकेबाजी. लिखाण आवडेल असेच आहे. महत्वाचे एकच एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यातील कार्य जाती पेक्षा श्रेष्ठच असते हे कुणाला समजत नाही असे नाही…….तसेच सामान्य नागरिक या घटनांचे दुरून डोंगर साजरे असेच अवलोकन करणार. मग प्रश्न उभा राहतो हा प्रताप (विरोध) कुणाचा राजकारणी कि जाती धर्माच्या ठेकेदारी करणार्यांचा….

 • Ankush Mane

  || पुरस्कार जातीला नव्हे कार्याla ||

  बाबासाहेबांनी कार्य

  राजा
  शिवछत्रपती’ या महाग्रंथासह अनेक पुस्तके, देश-विदेशातील १२ हजारांहून
  अधिक व्याख्याने, ‘जाणता राजा’सारखे आशिया खंडात गाजलेले महानाटय़, या
  साऱ्या तपस्येतून बाबासाहेबांनी तब्बल ७५ वर्षे शिवचरित्र तीन पिढय़ांपर्यंत
  पोहोचविले

  बाबासाहेबांच्या शिवचरित्रात जिजाऊंचा अपमान झाल्याचा
  साक्षात्कार आता ५० वर्षांनतर कसा काय झाला?केवळ एखाद्या वाक्यासाठी
  संपूर्ण शिवचरित्रावर आक्षेप घेणे योग्य नाही.त्यातही जे आक्षेप आहेत
  त्यावर खुली चर्चा होऊ शकते. त्यासाठी एवढा गदारोळ माजवण्याची गरज नाही,

  पुरंदरे ब्राह्मण आहेत म्हणुन त्यांना विरोध करतात’’त्यांनी आधी खालील नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे.

  खालील नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे.
  ● राजामाता सुमित्राराजे भोसले
  ● माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील
  ● माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण,
  ● माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील,
  ● शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,
  ● माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी,
  ● ‘पानीपत’कार विश्वास पाटील
  ● इतिहास संशोधक न. र. फाटक
  ● कवी कुसुमाग्रज,
  ● सेतुमाधवराव पगडी,
  ● आचार्य अत्रे,
  ● शिवाजीराव भोसले,
  ● नरहर कुरुंदकर,
  ● भारतरत्न लता मंगेशकर,
  ● डॉ. रघुनाथ माशेलकर,
  ● डॉ. विजय भटकर


  डी. वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने तर त्यांच्या इतिहास
  संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही
  सन्माननीय पदवी देऊन गौरविले

  महाराष्ट्रात जन्म घेऊन ज्यांचा महाराष्ट्रास कणभरही लाभ झाला नाही असे काही
  लोक शिवशाहीरांना देण्यात येणार्‍या पुरस्काराविरोधात आपल्या पिचक्या
  मांडीवर थाप मारून आव्हानांची भाषा करीत आहेत.
  . पुरंदरे यांच्या
  विरोधात राष्ट्रवादीचा सगळ्यात ‘तिरस्करणीय’ चेहरा जितेंद्र आव्हाड यांनी
  म्हणे रान उठवले आहे. राष्ट्रवादीच्या या माकडाचे कर्तृत्व ते काय?
  हिंदुस्थानात विध्वंस घडवणार्‍या इशरत जहांसारखी ‘तोयबा’ अतिरेकी ज्या
  आव्हाडांची गुरुमाता आहे त्यांनी शिवशाहीरांसारख्या शिवभक्तास अपमानित
  करणारी भाषा करावी?
  महाराजांची जात सांगणारी माणसे गल्लीबोळातून ढिगांनी
  पडलेली आहेत. मिशीला पीळ मारणारी आणि वार्‍यावर दाढ्या उडविणारी माणसेही
  कमी नाहीत. राजकारणात तर शिवाजी महाराज हे एक चलनी नाणेच झाले आहे, पण
  ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाने भारून जाऊन त्यासाठी जिवाचे रान करणारे एकच
  बाबासाहेब पुरंदरे आहेत,

 • Vinay Trivedi

  I can give answer of your question .. Bramhin asne dosh ahe ka ?… nahi .. pan bramhinwadi asne yaat dosh ahe means it doesnt matter to kontya caste cha ahe ki religion cha ahe jar tyache behaviour he bramhinwadyasarkhe means
  eg.
  1. Jo mhanto ki 10 years chya muliche vivah he Hindu dharmachya Virodhat Ahe
  2. Jo swathala kattar Hinduwadi superior and dusrya religion or caste la kanishta samjato kinva wagavto
  3. Intercaste chya virodhat ahe
  4. Who gives more importance to religion than Moral Values
  5. Pothi Puran,Rudhi Parmpara , Karmkand badal tyache beliefs ahet
  6. Who dont believe on science and keep believes on principles who already defined
  7. Who believes on superstitions
  8. Cow is mother of Hindu. So worship her.
  why not pig and other animals ??

  Pan Hindu aslyacha badejav pana kinva swabhiman he pan asne chukichech ahe
  Karan Jenva tumhi swathala hindu mhanta tenva tumhi pratek manushya jati pasun swathala vibhakt karta he pan barobar

  What is conclusion??
  Atheism is the final solution !!!

  If the person is wrong considering all facts…
  There is no need to give reward for that person that should be accepted.

  Media is third pillar of democracy so they have to build society on the
  principles of equality,fraternity and freedom.

 • Vinay Trivedi

  महाराष्ट्रभुषण प्राप्त व्यक्तींची यादी वाचावी. ● १९९६ – पु.ल.देशपांडे (साहित्य) ● १९९७ – लता मंगेशकर (कला,संगीत) ● १९९९ – विजय भटकर (विज्ञान) ● २००१ – सचिन तेंडुलकर (क्रीडा) ● २००२ – भीमसेन जोशी (कला,संगीत) ● २००३ – अभय व राणी बंग (आरोग्यसेवा) ● २००४ – बाबा आमटे (समाज सेवा) ● २००५ – रघुनाथ अनंत माशेलकर (विज्ञान) ● २००६ – रतन टाटा (उद्योग) ● २००७ – रा.कृ.पाटील (समाज सेवा) ● २००८ – नाना धर्माधिकारी (समाजसेवा) ● २००८ – मंगेश पाडगावकर (साहित्य) ● २००९ – सुलोचना लाटकर (कला,सिनेमा) ● २०१० – जयंत नारळीकर (विज्ञान) ● २०११ – अनिल काकोडकर (विज्ञान) वरील यादीमध्ये बहुतांश व्यक्ती ब्राह्मण आहेत.. पण यांना का विरोध झाला नाही याचे पुरंदरे भक्तांनी उत्तरे द्यावीत.

 • एक पुणेकर

  Sir,
  माज़्या मते शीर्षक योग्य निवडायला हवे होते. (हे म्हणजे एका समाजावर खुप मोठा अन्याय झाल्यासारखे दर्शवत आहे)
  ब्राह्मण असणे दोष आहे असे कुठेच व्यतित होत नाही.
  आजपर्यंत १५ पैकी तब्बल १३ महाराष्ट्रभूषण पुरस्कार ब्राह्मण व्यक्तिना मिळाले आहेत हे पहा. तेवा कोणीही विरोध नाही केला. का हो? याचा अर्थ हे जातीचा मुद्दा नाही तर वैचारिक मुद्दा आहे.
  मा. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते टेवा का नाही हां विरोध जाला?

  मुसलमान आणि बहुजन वर्गांनेच राजाना जास्त साथ दिली आहे. (पुराव्यानिशी इतिहास आहे)
  हां इतिहास बाबासाहेबांनी का पुरस्कृत नाही केला?? ज्योतिबा फुलेंचा सन्दर्भ का नाही दिला. जे की मुख्य कर्ते होते शिव इतिहास शोधाचे।

  शिवरायांबद्दल प्रेमाचे दाखले तपासण्यासाठी…
  का नाही कोणी जेम्स लेन ने विकृत इतिहास लिहिला टेवा त्याला विरोध करायचे धाडस केले? जेम्स लें ला सहकार्य करणारे कोण होते?/ त्यांनी का विकृत इतिहास लिहु दिला??
  फ़क्त संभाजी ब्रिगेड ने हां विरोध केला. (मई कोणी कार्यकर्ता नाहि। एक सामान्य नागरिक आणि लोकमत चा दैनंदिन वाचक आहे)

  बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकात दिलेले वादग्रस्त मुद्दे पटतात का तुम्हाला वा येथील लोकाना. पद्धतशीर आपण का बगल देतोय या मुद्याना?
  त्या मुद्द्यांचा खुलासा होने गरजेचे आहे चुकीचे सन्दर्भ भविष्यात घेतले जातील ऎसे वाटत नाही का कोणाला?

 • एक पुणेकर

  लेखाचा शेवट अतिशय उत्तम…
  सर्वस्वी मान्य!!

 • Mi Marathi

  मी मागील २ ते ३ वर्षांपासून संभाजी ब्रिगेड आणि अन्टी संभाजी ब्रिगेड चा मागोवा घेत आहे . त्यामध्ये मला काही लक्षात आलेले मुद्दे प्रस्तुत करीत आहे . परंतु जात सांगायची ना मला लाज आहे ना अभिमान पण दुर्दैवाने आतापर्यंत अनेक समाजसुधारकांनी केलेल्या कार्याला हरताळ फासला गेला आहे आणि जात आहे म्हणून मुद्दे प्रस्तुत करण्याआधी मी सांगू इच्छितो कि ना मी ब्राह्मण आहे ना मराठा मी हिंदू नाभिक आहे आणि छत्रपतींचा मर्द मराठा मावळा आणि त्याच्यासुद्धा आधी मी एक भारतीय नागरिक आहे.

  मुद्दा १ – SB मध्ये कोण आहेत ? तर म्हणे मराठा आणि बहुजन समाज. जर जातपात मानत नाहीत तर मराठा आणि बहुजन असे दोन वेगळे गट का ? आणि जर असतील तर ते हिंदू आहेत का ?

  मुद्दा २ – ASB मध्ये कोण आहेत ? तर समस्त हिंदू धर्मीय. पण धर्म म्हणजे काय? धर्माने आपण खरेच वागत आहात का?

  मुद्दा ३ – SB हे हिंदू धर्मीय आहेत? का त्यांनी काढलेले शिवधर्मीय आहेत? जर हिंदू धर्मीय असतील तर , देविदेवतांचा जो अपमान ह्यांची काही नेते लोक करतात तो ह्यांना कसा काय सहन होतो ? आणि जर शिवधर्मीय असतील तर ह्यांची काही नेते दहीहंडी का साजरी करतात?

  मुद्दा ४ – ASB , देविदेवतांचा अपमान का आणि कसा काय सहन करतात? आणि पुन्हा त्या अपमानाला प्रसिद्धी का देतात? हिम्मत असेल तर न्यायालयात दाद का मागत नाहीत?

  मुद्दा ५ – SB म्हणते कि आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढतो , जर असे असेल तर सारखे सारखे भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव का म्हणते ? आणि कालची जाळपोळ आणि भांडारकर तोडफोड हि कोणती लढाई आहे ?

  मुद्दा ६ – ASB म्हणते कि SB तुम्ही रस्त्यावर या मग आम्ही दाखवतो. कशासाठी?काय दाखवणार? SB चे भडक व्यक्तव्य आणि कृतीची तुम्ही तक्रार का देत नाहीत? दोन वर्षांपूर्वी ASB च्या लोकांची आणि बाबासाहेबांची तक्रार SB ने संपूर्ण महाराष्ट्रात केली होती ना?

  मुद्दा ७ – SB म्हणते कि बाबासाहेबांनी, छत्रपती आणि त्यांच्या कार्यावरती त्यांच्या चारीत्र्यावरती शिंतोडे उडवले. हे तुम्हाला कोणी सांगितले? आणि शिंतोडे उडविले तेही तब्बल ५० वर्षे?? जर हे खरे असेल तर मग सातारा गादी,कोल्हापूर गादी ह्यांनीच आधी खटला दाखल केला असता ना ???आणि त्यातही तुम्ही प्रसिद्धीला आणलेल्या लेनचा सुगावा लागल्यानंतर सलग १५ वर्षे जाणते, लोकमान्य, नेते असताना लगेच त्याच क्षणी राष्ट्रद्रोहाचा खटला का नाही चालवला बाबासाहेबांवर ????

  मुद्दा ८ – ASB म्हणते कि जागर परिषदांचा काही उपयोग होणार नाही. अरे!! पण जर तुम्हाला माहित आहे कि चुकीच्या गोष्टींसाठी ह्या जागर परिषदा आहेत तर मग तुम्ही समोरासमोर चर्चा का केली नाहीत? परिषदा बंद पडण्यासाठी का तक्रार दिली नाहीत सगळीकडे? फुकटचा मनस्ताप महाराष्ट्राला का दिलात? आणि ह्यामध्ये तुम्हाला खर्या नागरिकांची काळजी वाटली नाही का?

  आणि हा शेवटचा मुद्दा ९ सर्वांसाठी – फक्त आपण भूतकाळातच जगत राहणार आहोत कि , भूतकाळातील राष्ट्रभक्ती अंगी बाळगून भारताला बलशाली, गौरवशाली बनविणार आहोत? नाहीतर पुन्हा बाहेरील अंध,क्रूर शक्ती देशावर आक्रमण करेल आणि पुन्हा देश अंधारात…. बघा!! एक व्हा. मागील सगळ्या वाईट गोष्टी,घटना विसरून भारताला बलशाली, गौरवशाली बनवूया.

 • Indian Politician

  बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासक आहे असा अट्टहास हाच मुळात मोठा विनोद आहे. बाबासाहेब मनोरंजक आणि भावना गहिवरून आणणारे एकतर्फी एकांगी हिंदुवादी लिखाण करतात ज्यात ते “हिंदवी स्वराज्य” गोब्राह्मण प्रतिपालक” काल्पनिक चौकटी तयार करून शिवाजी महाराजांची हिंदू धर्म वेडे होते अशी प्रतिमा निर्माण करतात. तसेच रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव काल्पनिक चरित्र जोडीला निर्माण करतात शिवाजी महाराजांचा काळ हा तुकाराम महाराजांचा रामदास स्वामी इथे कुठे आले सगळ्या भाकड कथा रंगवून खोत इतिहास रचायचा परत “हिंदू” शिवाजी महाराजानच्या काळात अस्तित्वात नव्हता हा शब्द प्रयोग इंग्रजांनी केला तो पण १८ व्या शतकात शिवाजी महाराज यांचा कालखंड १७ व्या शतकातला.बरे शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३० टक्के मुसलमान सैनिक होत्ते हे सोयीस्कर रित्या भूल्वायचे हे इतिहासाला न्याय देणारे नाही आणि शिवाजी महाराजान वर पण अत्याचार आहे सगळी भामटे गिरी करून आपण फक्त जनसंघाचे विचारधारेच्या प्रचारचे काम लेले म्हणून संघाच्या माणसाला पुरस्कार देणे योग्य नव्हे.

 • Indian Politician

  बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासक आहे असा अट्टहास हाच मुळात मोठा विनोद आहे. बाबासाहेब मनोरंजक आणि भावना गहिवरून आणणारे एकतर्फी एकांगी हिंदुवादी लिखाण करतात ज्यात ते “हिंदवी स्वराज्य” गोब्राह्मण प्रतिपालक” काल्पनिक चौकटी तयार करून शिवाजी महाराजांची हिंदू धर्म वेडे होते अशी प्रतिमा निर्माण करतात. बरे शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३० टक्के मुसलमान सैनिक होत्ते हे सोयीस्कर रित्या भूल्वायचे हे इतिहासाला न्याय देणारे नाही आणि शिवाजी महाराजान वर पण अन्याय आहे तसेच रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव काल्पनिक चरित्र जोडीला निर्माण करतात शिवाजी महाराजांचा काळ हा तुकाराम महाराजांचा रामदास स्वामी इथे कुठे आले सगळ्या भाकड कथा रंगवून खोत इतिहास रचायचा परत “हिंदू” हा शब्द शिवाजी महाराजानच्या काळात अस्तित्वात नव्हता हा शब्द प्रयोग इंग्रजांनी केला तो पण १८ व्या शतकात शिवाजी महाराज यांचा कालखंड १७ व्या शतकातला. सगळी भामटे गिरी करून आपण फक्त जनसंघाचे विचारधारेच्या प्रचारचे काम लेले म्हणून संघाच्या माणसाला पुरस्कार देणे योग्य नव्हे.

 • Harshaal Date

  ज्याला त्याला आपापली जात कुरवाळत बसण्याची हौस. जोपर्यंत आपल्या जातीच्या माणसाला त्रास होत नाही तोवर जातीयवादाबद्दल मूग गिळून बसायचे. त्रास झाला की ऊर बडवायचे. जाती तशाच ठेवून जातीयवाद काही संपावयचा नाही, एवढे मात्र खरे.

 • milind jogdand

  Khup Chhan…

 • Kundan Rathod

  Jat mothi …Dharma..motha ..rashtra bhakti..mothi…ki..manvata…mi intra caste..inter caste..intra religion..inter religion..intra state ..inter state..lap lap..etc wxtc….barech kahi pahto…shevti ekach kalal…manus ya pranyala..bhandayala koni tari lagte…..saglya..jati dharma…eka jagi anun..jag bhar ekach…dharma…kela..tari apla kurapati buddhi kahi tari shodhun kadte….mag te varn bhed aso..ki ling bhed…ani parat ..tech dhade girwanar…….bas ekach lakshat theu….Khara to ekachi dharm jagala…prem ….ata he sangnare..sane guruji..kon hote..caste kay…ya var pudhe discussion nko…

 • Yash Joshi

  “जातीव्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली”, हा आरोप मला मान्य नाही .

  आपल्या महाराष्ट्रीय समाजातील जातींची नावे पाहिल्यावर लक्षात येईल कि “माळी-नाभिक-शिंपी-वाणी-कुणबी-तेली” इत्यादी सर्व नावे हि व्यवसायावरून पडली आहेत. त्यामुळे “जातीव्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली” हा आरोप अत्यंत घृणास्पद आणि निन्दनीय आहे.

  जेव्हा एखाद्या कुटुंबातील मुले आपल्या बापाचाच व्यवसाय पुढे चालवतात , तेव्हा साधारण १० पिढ्यानंतर तो व्यवसाय हीच त्या समस्त कुटुंब-सदस्यांची ओळख बनून जाते. आणि हि प्रक्रिया जगाच्या अंती जाऊतोपर्यंत शाश्वत राहणार आहे.

  आजही भारतीय समाजात कलाकारचे मुलगे सिनेमात जातात, डॉक्टरचे मुलगे डॉक्टर होतात, इंजीनियरचे मुलगे इंजिनियर होतात, तसेच सरकारी कर्मचारी आपल्या मुलांना सरकारी नोकरीसाठी वशिले लावतात, काहीकाही सरकारी अधिकारी तर आपल्या मुलीच्या सरकारी नोकरीसाठी थेट प्रवेश परीक्षेचे निकष बदलतात. या प्रकाराने साधारण १०-२० पिढ्या गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जाती समाजात निर्माण होणारच आहेत.

  आणि यातूनच तो व्यवसाय त्या समस्त कुटुंब सदस्यांची ‘ज्ञाती’ अर्थात ‘ओळख’ किंवा अपभ्रंशाने ‘जाती’ बनून जाते. “ज्ञा” हा संस्कृत धातू आहे, ज्याच्या अपभ्रंशातून “जाणणे-जाणता-जात” असे शब्द निर्माण झाले आहेत.

  मात्र, जाती व्यवस्थेच्या लाभार्थी असलेल्यांनी जातिव्यवस्थेतील शोषितांसाठी सहानुभूती बाळगायला हवी आणि त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, आणि त्या बाबतीत ब्राह्मण समाज काही प्रमाणात मागे पडला.

  मात्र सर्वच ब्राह्मण तसे नव्हते हेही खरे आहे, महात्मा फुले यांची शाळा सुरु करण्यासाठी भिडेंच्या वाड्यात जागा देणारे भिडे किंवा महर्षी कर्वे किंवा पु. ल. देशपांडे, बाबा आमटे यांसारखी असंख्य नावे मी स्वतः वाचली आहेत.

 • indian

  माज़्या मते शीर्षक योग्य निवडायला हवे होते. (हे म्हणजे एका समाजावर खुप मोठा अन्याय झाल्यासारखे दर्शवत आहे)
  ब्राह्मण असणे दोष आहे असे कुठेच व्यतित होत नाही.
  आजपर्यंत १५ पैकी तब्बल १३ महाराष्ट्रभूषण पुरस्कार ब्राह्मण व्यक्तिना मिळाले आहेत हे पहा. तेवा कोणीही विरोध नाही केला. का हो? याचा अर्थ हे जातीचा मुद्दा नाही तर वैचारिक मुद्दा आहे.
  मा. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते टेवा का नाही हां विरोध जाला?

  मुसलमान आणि बहुजन वर्गांनेच राजाना जास्त साथ दिली आहे. (पुराव्यानिशी इतिहास आहे)
  हां इतिहास बाबासाहेबांनी का पुरस्कृत नाही केला?? ज्योतिबा फुलेंचा सन्दर्भ का नाही दिला. जे की मुख्य कर्ते होते शिव इतिहास शोधाचे।

  शिवरायांबद्दल प्रेमाचे दाखले तपासण्यासाठी…
  का नाही कोणी जेम्स लेन ने विकृत इतिहास लिहिला टेवा त्याला विरोध करायचे धाडस केले? जेम्स लें ला सहकार्य करणारे कोण होते?/ त्यांनी का विकृत इतिहास लिहु दिला??
  फ़क्त संभाजी ब्रिगेड ने हां विरोध केला. (मई कोणी कार्यकर्ता नाहि। एक सामान्य नागरिक आणि लोकमत चा दैनंदिन वाचक आहे)

  बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकात दिलेले वादग्रस्त मुद्दे पटतात का तुम्हाला वा येथील लोकाना. पद्धतशीर आपण का बगल देतोय या मुद्याना?
  त्या मुद्द्यांचा खुलासा होने गरजेचे आहे चुकीचे सन्दर्भ भविष्यात घेतले जातील ऎसे वाटत नाही का कोणाला?

  • Tushar khaire

   AGDI YOGYA WICHAR AAHE TUMCH MR.INDIAN SIR

close