नांदेडमध्ये ‘खाप’ पंचायत, 55 कुटुंबियांवर घातला बहिष्कार

August 20, 2015 8:46 PM0 commentsViews:

nanded news320 ऑगस्ट : अमरावती पाठोपाठ नांदेडमध्ये सामाजिक बहिष्काराचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुखेड तालुक्यातील बेटमोगरा गावात हा प्रकार समोर आलाय. दोन वर्षांपुर्वी भाऊबंदकीच्या वादातून गावात खून झाला होता. या खूनाला या 55 कुटुंबांना जबाबदार ठरवून जात पंचायतीनं जवळपास 55 कुंटुंबांवर सामाजिक बहिष्कार टाकलाय. 18 महिन्यापासून या कुंटुबाचं अन्न पाणी तोडलं, रोटीबेटीचा व्यवहार बंद केला. समाजातील इतर कुणीही या परिवारांशी संबध ठेवत नाही.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या बेटमोगरा या गावातील नाथपंथी डवरी गोसावी या समाजातील 55 कुटुंबीयांवर जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार घतलाय. 5 लाख रुपये दंड भरल्याशिवाय बहिष्कार मागे न घेण्याचा निर्वाळा जात पंचायतीने दिला. जात पंचायतीच्या या आघोरी, अमानवीय निर्णयामुळे 55 कुंटुंबीय गेल्या 18 महिन्यापासून वाळीत आहेत. या लोकांशी यांच्या समाजाने रोटी-बेटीसह सर्व व्यवहार बंद केलेत. गावात 18 महिन्यापूर्वी एका युवकचा खून झाला होता. भाऊबंदकीच्या वादातून ही घटना झाल्याच सांगितल जातंय.

पण आरोपीला खून करण्यासाठी बेटमोगरा गावातील या 55 कुंटुंबीयांनी प्रोत्साहन दिलं असा आरोप आहे. आणि हाच ठपका ठेऊन 18 महिन्यापूर्वी जात पंचायतीने पंचायत भरवून या 55 कुंटुंबीयांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बाचेगाव जात पंचायतीने हा निर्णय घेतला. राज्यातील 845 गावांना पंचांनी आपला निर्णय कळ्वला.

जात पंचायतीच्या या निर्नयामुळे या लोकांशी यांच्या समाजाने रोटी-बेटीसह सर्व व्यवहार बंद केलेत. बहिष्कार असल्याने या कुटुंबियांच्या तरुण मुला-मुलींचे लग्न थांबले. शिवाय यांच्यातील कुणाचा मृत्यू झाला तर अंतिमसंस्काराला देखिल समाजातले लोक येत नाहीत. यांना देखिल समाजातील कोणत्याच कार्यात सहभागी होता येत नाही.

याच कुटुंबांपैकी विष्णु शिंदे यांची संगीता या तरुणीशी साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली… कुंकुवाचा कार्यक्रम देखिल सुरू झाला. मात्र त्याच वेळेला पंचाचा निरोप आला. आणि समाजातील काही वरिष्ठांनी साखरपुड्याचा हा कार्यक्रम रद्द करायला लावला. सामाजिक बहिष्कारामुळे संगीता आणि भाऊदासच्या आयुष्यातील सुखाचा क्षण क्षणातच दुखात बदलला.

दरम्यान, साखरपुडा रद्द झाल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना कळाल्यानंतर जात पंचायतीने बहिष्कार आणि वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला. राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी पंचाशी संपर्क करुन हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण पंचांनी आपला निर्णय न बदल्याने संघटनेने कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close