भारतानं पाकला ठणकावलं, हुर्रियतशी चर्चा तर बैठक रद्द !

August 21, 2015 10:37 PM0 commentsViews:

78modisharif23 ऑगस्ट : 23 ऑगस्टला फुटीरतावादी हुर्रियत नेत्यांच्या भेटीसाठी अडून बसलेल्या पाकिस्तानाला भारताने चांगलेच फटकारून काढले आहे. हुर्रियत नेत्यांची भेट घ्यायची असले तर चर्चा होणार नाही असं स्पष्टपणे भारताने पाकला सुनावले आहे. चर्चेत तिसरा पक्ष असू नये असं स्पष्टपणे भारताने बजावलं आहे.

सीमेवर गोळीबार, दहशतवाद्यांच्या घुसखोरी या ना त्या मार्गाने कुरापत्या काढणार्‍या पाकिस्तानसोबत येत्या 23 ऑगस्टला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार आहे. पण पाकचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी फुटीरतावादी हुर्रियत नेत्यांची भेट घेण्याचा अट्टहास केलाय. सरताज अजीज यांनी फुटीरतावादी हुर्रियत नेत्यांना भेटू नये, असं भारतानं पाकला बजावलं होतं. पण, अजीज यांनी भारताची अट मान्य केली नाही. भारताने अशी चेतावनी देऊ नये हे चांगलं लक्षण नाही असं अजीज यांचं म्हणणंय. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी मात्र, अजीज यांनी फुटीरतावाद्यांना भेटू नये असं स्पष्टपणे बजावण्यात आलंय असं रोखून सांगितलं. भारत कोणत्याही परिस्थिती अजीज यांची हुर्रियत नेत्यांशी भेट कधीच मान्य करणार नाही असंही ते म्हणाले.

या अगोदर पाकिस्तान सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पाक पराष्ट्र मंत्रालयाने आम्हाला एनएसए स्तरावरची चर्चा हवी आहे. पण, यासाठी कोणत्याही अटी असू नये असं स्पष्ट केलं. अजीज यांची अडवणूक योग्य नाही असंही पाकचं म्हणणं आहे. एवढंच नाहीतर भारत सरकारच चर्चेसाठी तयार नाही असा उलटा आरोपच केला.

विशेष म्हणजे, रशियामध्ये 10 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात झालेल्या चर्चेत दहशतवादाच्या मुद्यावर नवी दिल्लीत दोन्ही देशांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली पाहिजे अशी एकवाक्यता झाली होती. यासाठीच सरताज अजीज हे 23 ऑगस्टला भारतात येणार आहे. आणि त्याच दिवशी भारतातील पाक उच्चायुक्ताजवळ ‘पाकिस्तान हाऊस’मध्ये एका कार्यक्रमात हुर्रियत नेत्यांसोबत भेट होणार आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी 23 ऑगस्टच्या या कार्यक्रमासाठी फुटीरतावादी नेत्यांना निमंत्रणही पाठवली आहे. यामध्ये सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाइझ उमर फारुक, यासीन मलिक आणि नईम खान या फुटीरतावादी नेत्यांचा समावेश आहे. याच भेटीवर भारताने आक्षेप घेतलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close