मांझी-द माऊंटन मॅन: ‘शानदार…जबरदस्त…’!

August 21, 2015 11:39 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

मांझी – द माऊंटन मॅन… एक जबरदस्त अनुभव देणारा सिनेमा…याआधी येऊन गेलेल्या केतन मेहतांच्या सिनेमात कुठेतरी काहीतरी फसलं होतं, पण आता मांझी बघून म्हणावंसं वाटतं, केतन मेहता इज बॅक… बिहारमधल्या एका गावात घडलेली ही सत्यकथा… आठ वर्षांपूर्वी ज्यांचं निधन झालं त्या ‘दशरथ मांझी’ यंाच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा…बायोपिक हा केतन मेहता यांचा आवडता प्रांत असावा.. सरदार, मंगल पांडे, रंगरसिया आणि आता मांझी…सरदार सारखाच असरदार सिनेमा बनवण्यासाठी केतन मेहता आणि टीमने प्रचंड मेहनत घेतलीये. ‘मांझीचा माऊंटन मॅन’ कसा झाला इंथपर्यंतचा सगळा संघर्षमय प्रवास टिपताना यामध्ये सामाजिक बदल, अस्पृश्यता, जमीनदारांकडून होणारी पिळवणूक असे सगळे विषय आणलेले आहेत. स्वत:च्या प्रेमासाठी वर्षांनुवर्षं पहाड फोडणं एवढाच या मांझीचा संघर्ष नाही, त्यासाठी त्याला कोणकोणत्या दिव्यातून जावं लागतं याची अंगावर येणारी कहाणी या सिनेमात दिसेल.

काय आहे स्टोरी ?

manjhi_2दशरथ मांझी… बिहारमध्ये गया जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात राहणारा…तरुणपणात धनबादमधल्या खाणीवर काम केल्यामुळे गावाबाहेरचं जग त्याने बघितलंय…देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी हा पुन्हा गावात येतो. गावातली परिस्थिती बदललेली नसते, गावाला असतो पहाडांचा वेढा… तालुक्याच्या गावी जायचं तर पहाड चढून जावं लागतं.

याच वळशामुळे मांझीच्या बायकोला वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि तिथेच मांझी ठरवतो की हे पहाड फोडून रस्ता तयार करायचा आणि तेही एकट्याने…कुणाचीही मदत न घेता… सहज विश्वास बसत नाही पण ही गोष्ट खरी आहे, प्रत्यक्ष घडलेली आहे. 22 वर्षं सतत या भगीरथाने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि या पहाडातून रस्ता बनवला. त्याला वेडं ठरवलं गेलं, त्याचा छळही केला गेला, पण तो हटला नाही, त्याची जिद्द कायम होती. त्याच अस्सल जिद्दीची अस्सल फिल्म आहे मांझी – द माऊंटन मॅन…

परफॉर्मन्स

manjhi_3खरंतर, मांझीमध्ये थोडा फिल्मीपणा सुद्धा आहे. खरंतर, हा फिल्मीपणा टाळता आला असता, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो केवळ आणि केवळ नवाझुद्दीन सिद्दीकीमुळे…भूमिका कोणतीही असो, नेहमी झोकून देऊन काम करायचं या प्रकारातला हा अभिनेता… इथे तर त्याला मोकळं मैदान होतं… मांझीचा निष्पापपणा, प्रेमळपणा, बायकोचा मृत्यू झाल्यावर आलेलं रितेपण, मग घेतलेला ध्यास, अशक्यही शक्य करुन दाखवण्याची धडाडी, याच ध्यासातून स्वत:च्याच वेगळ्या विश्वात जाऊन पोचलेला मांझी, असे सगळे टप्पे नवाझुद्दीनच्या अभिनयातून अक्षरश: जिवंत झालेत.

रेटिंग 100 पैकी 75
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close