सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी दौरा

August 23, 2015 6:09 PM0 commentsViews:

CM in UArangabad
23 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये राज्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहे. औरंगाबादमध्ये दुष्काळासंबंधी आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. इतकंच नाही तर सप्टेंबरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची एक बैठकही औरंगाबादमध्ये घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या बैठकीत दुष्काळावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा होईल.

औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी घोषणांचा पाऊसच पाडला.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा छावणी आणि पाण्याचे नियोजन केलं असून या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुष्काळी भागात रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मनरेगाच्या माध्यमातून मोठी कामं हाती घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यात या कामांचा फायदा होईल, असंही त्यांनी म्हटलं. मराठवाड्यातील धरणांमध्ये नाशिक, अहमदनगरमधली धरणांमधून पाणी सोडता येईल का, याचेही नियोजन सुरू असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी 556 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून भविष्यात आणखी निधी मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. जिथे खरीप पीक घेता आलं नाही तिथे रबीचं पीक वेळेपूर्वी घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर आगाऊ घेतलेल्या रबीला विमा संरक्षण द्यावं, अशी विनंती केंद्राकडे करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी 26 योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठिकठिकाणी ग्रामसभा घेण्याचे आदेष जिल्हाधिकार्‍यांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. दुष्काळ आवडे सर्वांना असं म्हटलं जातं. तेव्हा दुष्काळाचा फायदा लाटणार्‍यांना कुरण खाता येणार नाही, अशी पारदर्शी व्यवस्था केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

जालना जिल्ह्यातल्या सरकारी कर्मचार्‍यांनी आपला महिनाभराचा पगार, तर पालकमंत्र्यांनीही आपला सहा महिन्याचा पगार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी दिला आहे. त्याशिवाय सामाजिक संस्थांनीही शेतकर्‍यांना मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close