पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला

August 23, 2015 4:21 PM0 commentsViews:

crime

23 ऑगस्ट : कामावर निघालेल्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. सुदैवाने या हल्ल्यात तरुणी थोडक्यात बचावली असून पोलिसांनी हल्ला करणार्‍या चौघांना गजाआड केलं आहे. या तरुणीवर एकतर्फी प्रेम करणार्‍या माथेफिरूने तरुणीवर हल्ला करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती.

ही तरुणी एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करते. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही तरुणी बाईकवरून कामावर जात असताना राजेंद्रनगर इथल्या सचिन तेंडुलकर उद्यानासमोर तिच्यावर हल्ला झाला. पण तिने वेळीच बाईक वळवल्यामुळे ती थोडक्यात बचावली. सनी ऊर्फ लक्ष्मीकांत क्षीरसागर याचं पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. पण तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने चक्क 1लाख रुपयात या तरुणीला जीवे मारण्याची सुपारी दिली. याप्रकरणी धनकवडीमध्ये राहणार्‍या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. खुनाची सुपारी घेणारे संतोष जाधव, प्रभू पालकर आणि सोमनाथ जाधव या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मीकांतलाही अटक झाली आहे.

दरम्यान, एकीकडे औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमप्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे एका तरुणीवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवली, तर दुसरीकडे पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीवर सुपारी घेऊन हल्ला करणार्‍या आरोपींना दोन तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close