बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध तक्रार दाखल

August 25, 2015 5:47 PM0 commentsViews:

Balganga

25 ऑगस्ट :  ठाणे जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन प्रकल्पातील्या घोटाळ्या प्रकरणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने म्हणजेच एसीबीने मुख्य इंजिनिअर बाळासाहेब पाटीलसह, पाच इंजिनिअर आणि काँट्रॅक्टर अशा एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कोपरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी याप्रकरणी राजेश रिठे आणि निसार खत्री यांना अटक केली आहे. राजेश रिठे हे रायगडचे माजी उपअभियंता आहेत तर निसार खत्री कंत्राटदार आहे.

राज्यातल्या बहुचर्चित सिंचन घोटाळय़ाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी सुरू झाल्यानंतर आज हा पहिला गुन्हा दाखल झाला. खोटी कागदपत्रं तयार करणे, कट रचणे आणि पदाचा गैरवापर करुन सरकारचं नुकसान करणे, स्वत:चा फायदा करुन घेणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमध्ये तपासात ही बाब उघड झाल्यानंतर एसीबीने याप्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर गुन्हे दाखल झालेल्या अधिकार्‍यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एसीबीच्या पथकाने छापे मारण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या घोटाळ्यात शाई धरणाचे फोटो वापरण्यात आलेत. या संपूर्ण प्रकारणाची सखोल चौकशी होणार आहे. अनेक बड्या नेत्यांसह आणखीही अधिकारी एसीबीच्या चौकशीत सापडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी अंजली दमानिया यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. बाळगंगा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली होती. तसंच या कामाचं कंत्राट एफ ए कंपनीला मिळवून देण्यासाठी कोकण विकास पाटबंधारे विभागाच्या सहा अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा गैरवापर
केला, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close