दुष्काळावर मात, मृत नदीलाच दिले जीवदान !

August 28, 2015 9:23 AM0 commentsViews:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

28 ऑगस्ट : मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट आहे. सततच्या कमी पावसामुळे गेल्या पाच वर्षांपासून शेतकर्‍यांना पिकं घेणं मुश्किल झालेलं आहे, पण याच मराठवाड्यातल्या 15 गावांचा पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटलेला आहे. कारण ग्राम विकास या सामाजिक संस्थेनं एका मृत नदीलाच जीवदान दिलंय. लोकजागृती आणि लोकसहभागातून सिंदोन या दुष्काळी भागाचा कसा कायापालट झाला..याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट…

abad pakjऔरंगाबादपासून 12 किलोमीटर अंतरावरचं सिंदोन गाव…या गावातला तरुण शेतकरी शेख हसन आज आपल्या विहिरीत समाधानाने डोकावतोय. गेली चार वषंर् कोरड्या असलेल्या विहिरीत आता भरपूर पाणी आहे. याचं समाधान त्याच्या चेहर्‍यावर आहे. याच विहिरीच्या पाण्याच्या जोरावर त्याने आपल्या शेतात मका पेरला, ज्याची कणसं मस्तपैकी डौलतायत. मृत चित्ते नदीला जीवदान मिळाल्यामुळेच सिंदोनचंही पुनरुज्जीवन झालं. सिंदोन हे गाव दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. सिंदोनमधून दररोज 2 ते 3 हजार लिटर दूध औरंगाबादला जातं. गेल्या दुष्काळात मात्र परिस्थिती भयंकर होती. प्यायलाच पाणी नसल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी आपली दुभती जनावरंच  बाजारात विकली होती. यंदा अगदी उलट परिस्थिती आहे. चित्ते नदीचे पाणी शिवारात अडवलं गेल्यामुळे गावात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झालंय. आता गावातल्या महिलांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत नाही.

सिंदोन शिवारात खरीपाची पिकंही जोमानं डोलताना दिसतायत. सिंदोनसह दहा गावांमध्ये हा कायापालट घडवून आणला ग्रामविकास संस्थेनं… या संस्थेनं इथल्या शेतकर्‍यांना चित्ते नदीचं महत्त्व पटवून दिलं आणि या नदीवर 19 ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवलं. पाणी अडवल्याने 8 गावांची भूजल पातळी वाढली आणि 452 कोरड्या विहिरी पाण्याने भरल्या, 6 गावं टँकरमुक्त झाली.

मराठवाड्याचं पाणीसंकट दूर करण्यासाठी सरकार कृत्रिम पावसाचे प्रयोग करतेय, या कृत्रिम प्रयोगांनी काही प्रमाणात दिलासा मिळेलही, पण खरा परिणाम साधेल तो सिंदोनसारख्या जलक्रांतीनेच…लोकसहभागातून, लोकजागृतीमधून दुष्काळ संपवता येऊ शकतो हे सिंदोन गावाने सिद्ध करुन दाखवलंय. आता गरज आहे ती जास्तीत जास्त गावांनी त्याचं अनुकरण करण्याची आणि त्यासाठी या गावांना प्रोत्साहन देण्याची..

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close