‘त्या’ दिवशी शीनासोबत मलाही ठार मारणार होते -मिखाईल

August 29, 2015 2:35 PM0 commentsViews:

mikhail 334329 ऑगस्ट : ज्या दिवशी शीनाची हत्या करण्यात आली त्याच दिवशी मलाही ठार मारण्याचा प्रयत्न झाला असा खळबजनक दावा शीनाचा भाऊ मिखाईल यांनी केलाय. मिखाईलची पोलिसांनी चौकशी केली. या अगोदरही मिखाईलने आपल्याला मारण्याचा कट होता असं सांगितलं होतं.

शीना बोरा हत्या प्रकरणातला तपास आजही वेगाने सुरू आहे. आज सकाळी इंद्राणी मुखर्जीची खार पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली होती. आता तीनही आरोपींना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. त्या तिघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या आरोपींना घेऊन पोलीस गागोदेलाही जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, बोरा हत्या प्रकऱणात दररोज नवनवी आणि चक्रावून टाकणारी माहिती मिळतेय. आता त्यात भर पडलीय ती मिखाईल बोराच्या जबानीची. मिखाईलनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शीनाची हत्या झाली त्या दिवशी मिखाईलही मुंबईत होता आणि इंद्राणी मुखर्जीनं आपल्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला असा दावा मिखाईलनं केला आहे.

मिखाईलने आपल्या जबाबात म्हटलंय, शीना बेपत्ता होण्याच्या काही दिवसांआधी इंद्राणीने आपल्याला गुवाहटीवरून शीनाच्या लग्नाच्या बोलणीसाठी बोलावून घेतलं होतं. त्यानुसार मी 24 एप्रिलला मुंबईत पोहचलो. इंद्राणीचा वरळीमध्ये फ्लॅट होता. मी तिथे पोहचलो तिथे अगोदरच संजीव खन्ना हजर होते. संजीव खन्ना, इंद्राणी आणि मी शीनाच्या लग्नाबद्दल बोलत होतो. त्यावेळी मला कोल्ड्रींगमधून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यामुळे मी काही काळ बेशुद्ध पडलो. शीनालाही याच फ्लॅटवर बोलावण्यात आलं होतं. पण ती येण्यास तयार नव्हती. जेव्हा तीला लग्नाची बोलणी करणार आहोत असं सांगितलं तेव्हा ती तयार झाली. शीनाला इंद्राणी आणि संजीवने वांद्र्यातील नॅशनल कॉलेजपासून पिक अप केलं. येताना त्यांनी साखरपुड्यासाठी अंगठीही खरेदी केली होती. आम्हा दोघांना याच घरात आणून ठार मारण्याच कट होता. पण, काही तरी वाईट घडण्याची कुणकुण लागताच मी तिथून पळ काढला. जेव्हा ते इथं आले मी नसल्याचं पाहिलं. त्यामुळे त्यांनी कारमध्येच शीनाचा गळा आवळून खून केला. आता पोलीस मिखाईलच्या जबानीची सत्यता पडताळून पहात आहेत.

 का झाला शीनाचा खून?

शक्यता 1
शीनाला तिच्या पालकांविषयी आणि इंद्राणीच्या पूर्वायुष्यातल्या काही गुपिताविषयी माहीत होतं. त्यामुळे इंद्राणीने शीनाचा खून केला.

शक्यता 2
इंद्राणीचा दुसरा नवरा संजीव खन्नाने त्याची आणि इंद्राणीची मुलगी विधी हिला संपत्तीत जास्तीत जास्त वाटा मिळावा म्हणून इंद्राणीला शीनाचा खून करायला मदत केली

शक्यता 3
इंद्राणीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी याला ‘न्यूज एक्स’ मधून बाहेर पडताना मिळालेला आणि शीनाच्या अकाऊंटमध्ये ठेवलेला पैसा परत द्यायला शीनाने नकार दिला

शक्यता 4
इंद्राणी आणि तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना यांनी संपत्तीत वाटेकरी नको म्हणून शीनाचा खून केला. मिखाईलचा खून करण्याचाही त्यांचा डाव होता

शक्यता 5
राहुल मुखर्जी आणि शीना बोरा यांच्यातले प्रेमसंबंध इंद्राणीला मंजूर नव्हते

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close