मोदी सरकार शेतकरी विरोधी, पाटण्याच्या रॅलीत पंतप्रधानांवर हल्लाबोल

August 30, 2015 5:52 PM0 commentsViews:

swabhiman rally
30 ऑगस्ट : बिहारमधल्या आगामी निवडणुकीमुळे तिथलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. पाटण्यात आज नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांनी ‘स्वाभिमान रॅली’ घेतली. या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी याही उपस्थित होत्या. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. मोदींनी बिहारला दिलेलं सव्वा लाख कोटींचं पॅकेज हे खोट्या नोटांसारखं आहे, त्याला काहीही किंमत नाही, त्याचा काही उपयोग नाही, असं नितीश म्हणाले. भूसंपादन विधेयकाच्या मुद्द्यावरूनही नितीश यांनी मोदींना लक्ष्य केलं. या विधेयकावरून मोदींना झुकावंच लागलं, अशी बोचरी टीका त्यांनी केली. 15 महिने झाले तरी काळा पैसा कुठे आहे, असा सवाल नितीशकुमार यांनी केला.

या स्वाभिमान रॅलीत झालेली गर्दी ही बिहारच्या जनतेनं केलेल्या निश्चयाचं द्योतक आहे, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं. ही गर्दी बघून भाजपला हृदयविकाराचा झटका आला असेल, असंही लालू प्रसाद यांनी म्हटलं आहे. मुझफ्फरपूरमधल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी नितीश कुमार यांच्या डीएनएवरून शेलकी टीका केली होती. त्यालाही लालू प्रसाद यादव यांनी उत्तर दिलं. आम्हाला विकत घेता येऊ शकत नाही, हे बिहारची जनता मोदींना दाखवून देईल. आम्ही तर साध्या रिक्षावाल्यालाही आदराने बोलतो. आमच्या रक्तातच चांगले संस्कार आहेत. व्यापार्‍याचं रक्त असलेला कुठलाही परप्रांतीय आमचा अपमान करू शकत नाही, असा टोला लालूंनी मोदींना लगावला.

पाटण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सोनिया गांधींना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकार हे शेतकर्‍यांच्या विरोधातलं सरकार आहे असं म्हणत सोनियांनी भूसंपादन विधेयकाबाबतही सरकारवर टीकास्त्र सोडलं. शेतकर्‍यांच्या हक्कासाठी काँग्रेस लढणार असल्याचं सोनिया गांधींना स्पष्ट केलं.

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या डीएनएच्या टीकेला उत्तर म्हणून या स्वाभिमान रॅलीमध्ये डीएनए नमुने गोळा करण्यासाठी 80 केंद्र उघडण्यात आली होती. जनता परिवाराच्या ‘शब्दवापसी’ या अभियानांतर्गत ही डीएनए गोळा करण्याची मोहीम राबवली जात आहे. या केंद्रांवर एका प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये केस आणि नखांचे नमुने गोळा केले जात आहेत. मी बिहारी असल्याचा मला अभिमान आहे आणि माझ्या डीएनएमध्ये काहीच दोष नाही. पण तुमच्या (पंतप्रधान) डीएनएबद्दल शंका असेल तर तपासून घ्या, असं या पाऊचवर लिहिलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close