शीना बोरा हत्याकांड : आरोपींसह मुंबई पोलिसांनी नेलं घटनास्थळी

August 30, 2015 8:32 PM0 commentsViews:

shenna bora_raigad case

30 ऑगस्ट : शीना हत्याकांडाची उकल करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामावर राय या तिघांना रायगड घेऊन गेले. रायगडमधल्या गागोटे गावात शिनाचा जळालेला मृतदेह टाकण्यात आला होता. पण घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना लगेचच तिथून परत मुंबईला आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, इंद्राणी आणि संजीव तपासात सहकार्य करत नसल्याचंही सांगण्यात येतं आहे. दोघंही एकमेकांवर आरोप करत आहे.

इंद्राणीला शीनाबरोबरच मिखाईललाही मारायचं होतं, या मिखाईलच्या दाव्याला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला आहे. इंद्राणीचा मुलगा मिखाईल बोरा याचीही काल (शनिवार) वांद्र्यातल्या एका हॉटेलमध्ये चौकशी करण्यात आली. मिखाईलला मारल्यावर त्याचा मृतदेह ठेवण्यासाठीची सुटकेस पोलिसांना मिळालीय. सुदैवानं, त्या दिवशी मिखाईल घरातनं पळून गेला, आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला.दरम्यान, इंद्राणीनं मिखाईलला मानसिकरित्या दुर्बल घोषित करण्यासाठी एका मानसोपचारतज्ज्ञाला संपर्क केला होता. त्या मानसोपचार तज्ज्ञाचीही पोलीस चौकशी करणार आहेत. त्याचं नाव मात्र पोलिसांनी उघड केलेलं नाही.

दरम्यान, शीनाचा मृतदेहाचा फक्त सांगाडा शिल्लक होता अस पोलीस पाटलाचं म्हणणं आहे. याच पोलीस पाटलाला 2012 मध्ये शीनाचा मृतदेह आढळला होता. सरकारी डॉक्टरांनी हा सांगाडा पोस्ट मॉर्टेमसाठी ताब्यात घेतला आणि नंतर तो पुरण्यात आला, अशी माहितीही पोलीस पाटील गणेश ढेणे यांनी दिली आहे. या प्रकरणाच्या तपासात या सांगाड्याची फॉरेंसिक चाचणी अतिशय महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

23 मे 2012 ला हा सांगडा सापडला होता. पण हा सांगाडा मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला तेव्हा अपघाताची किंवा गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही, अशी कबुली पोलिसांनी दिली आहे. या सांगाड्याचे सॅम्पल जेजे हॉस्पिटलने शुक्रवारीच खार पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. त्याचबरोबर इंद्राणी आणि मिखाईल यांच्या रक्त आणि केसांचे नमुनेही फॉरेंसिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. तीन ते चार दिवसांत त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. ज्या कारमध्ये शीनाचा खून झाला ती कारही सापडली आहे. पण गेल्या तीन वर्षांत ती अनेकांच्या हातात गेली त्यामुळे ती अजून आमच्या ताब्यात मिळालेली नाही, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close