पारधी समाजातल्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

December 29, 2009 8:54 AM0 commentsViews: 2

29 डिसेंबर उस्मानाबाद जिल्ह्यातील साकत गावच्या राकेश पवार या पारधी समाजातल्या शाळकरी मुलाची वळूकच्या गावकर्‍यांनी दगडाने ठेचून हत्या केली. त्याच्यावर रस्तालुटीचा संशय घेण्यात आला होता. पण त्यादिवशी राकेश पवार शाळेत असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता या हत्येचं गांभीर्य अधिकच वाढलंय. 22 डिसेंबरला आई, भाऊ आणि बहिणीसमवेत असलेल्या राकेशची गावकर्‍यांनी त्यांच्यादेखतच क्रुर हत्या केली. त्याच्या आईबहिणीलाही बेदम मारहाण केली. राकेशच्या मृतदेहाचं घाईघाईत पोस्टमार्टेम करणार्‍यां पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे राकेशच्या घरच्यांना कुठलीही माहिती न देता राकेशचा दफनविधी करण्यात आला. राकेशवर हल्ला करणार्‍या 25 ते 30 गावकर्‍यांपैकी केवळ 11 जणांनाच अटक करण्यात आली आहे. त्यातही चारच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणात पोलीस कुणाच्या दबावाखाली काम करतायत असा सवाल आता उपस्थित केला जातोय. खैरलांजीसारखे प्रकरण होते, तेंव्हा लोक रस्त्यावर येतात. मात्र पारधी समाजातील मुलाला दगडाने ठेचून मारलं जात, तेंव्हा मार्क्सवादी, गांधीवादी किंवा इतर कोणी या समाजासाठी उभे रहात नाहीत. अशी खरमरीत टीका ज्येष्ठ विचारवंत आणि रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केली आहे. या घटनेच्या विरोधात आपण आंदोलन उभारणार असल्याच लेखक आणि भटके विमुक्त संघटनेचे नेते लक्ष्मण माने यांनी जाहीर केलं आहे. या समाजानंही त्याला पाठिंबा द्यावा असं आवाहनही लक्ष्मण माने यांनी केलं आहे.

close