पारधी मुलाची हत्या : 15 आरोपी अजूनही फरार

December 29, 2009 1:56 PM0 commentsViews: 63

29 डिसेंबर राकेश पवारच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे. यात सहभागी असलेल्या 15 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी उस्मानाबादचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकं तयार करण्यात आली आहेत. राकेशला मारहाण करताना गावकर्‍यांनी राकेशची आई आणि बहीणीलाही जबरदस्त मारहाण केली होती. त्या दोघींनाही उस्मानाबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे. भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके मंगळवारी घटनास्थळी आणि रुग्णालयातील राकेश पवारच्या जखमी कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. या अमानुष हत्या प्रकरणातील सगळे आरोपी उस्मानाबादमधल्या उळुप या गावचे आहेत. त्यांच्यावर कलम 302खाली मनुष्यवधाचा, तसंच ऍट्रॅासिटी आणि इतर दहा गुन्हे दाखल करण्यात आले आलेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बंडू सानप, बाबा शेख, चंद्रसेन वराळे, बिभीषण वराळे, कानिफनाथ वराळे, नितीन वराळे, पांडुरंग वराळे, कैलास वराळे, संपत चौघुले, पांडुरंग दराडे, गणेश पारकर अशी आहेत.

close