मराठवाड्याचं 25 टीएमसी पाण्याचं स्वप्न भंगलं, मुख्यमंत्र्यांकडून नकार

September 2, 2015 11:21 PM0 commentsViews:

CM in UArangabad02 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दुष्काळ दौर्‍याचा आजचा दुसरा दिवस आहे. किमान या दौर्‍यात तरी मुख्यमंत्री मराठवाड्याला हक्काचं 25 टीएमसी पाणी मिळवून देतील अशी भाबडी आशा तिथल्या दुष्काळी जनतेला होती. पण मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला फक्त 7 टीएमसी पाण्याचं आश्वासन देऊन 25 टीएमसी पाण्याची बहुप्रलंबित मागणी एकप्रकारे अमान्यच केलीय.

डोकेवाडीच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेच्या अवाढव्य खर्चाचा पाढाच वाचला आणि मराठवाड्याला 25 टीएमसी नाहीतर नाही पण किमान 7 टीएमसी पाणी तरी नक्की मिळवून देईल, असं आश्वासन दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे मराठवाड्याचं बहुप्रलंबित 25 टीएमसी पाण्याचं स्वप्न एकप्रकारे भंग पावलंय असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, हे भाषण करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वेगळीच भूमिका घेतली होती. मराठवाड्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळवून देणारच असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी आम्ही मिळवून देऊ आणि त्यासाठी लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच जिल्हा प्रशासनाला आवश्यक तिथं पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याचे आदेशही दिले.

दरम्यान, उस्मानाबादचा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री पाच वाजेच्या सुमारात बीड जिल्ह्याच्याही दुष्काळ दौर्‍यावर रवाना झाले. सध्या
तिथं जिल्हा आढावा बैठक सुरू आहे. त्यापूर्वी बीडला पोहोचल्यानंतर त्यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा गावाला भेट दिली. तिथल्या पावसाअभावी जळालेल्या शेतीपिकांची आणि कोरड्या पडलेल्या विहिरींची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिथल्या दुष्काळ
पीडितांसोबतबही चर्चा केली. आढावा बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा आजचा मुक्काम हा बीडमध्ये असणार आहे. उद्या बीडचा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री परभणी आणि नांदेडचाही दुष्काळ दौरा करणार आहेत.

तर मुख्यमंत्र्यांनी औताडा इथल्या भाषणामध्ये रब्बीच्या पेरणीसाठी शेतकर्‍याला थेट नगदी मदत करण्याचं आश्वासन दिलं. विजेचे बिल आणि पीक कर्ज याबाबत निर्णय लवकरात लवकर होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close