…म्हणून शीनाला संपवलं, इंद्राणीचा कबुलीनामा

September 4, 2015 1:33 PM0 commentsViews:

indrayani404 सप्टेंबर : शीना बोरा आणि राहुलचे संबंध प्रगतीच्या आड येत असल्यानंच शीनाला संपवलं अशी कबुली इंद्राणी मुखर्जीनं दिलीये. गेली दहा दिवस इंद्राणीची कसून चौकशी सुरू आहे. दहा दिवसांच्या चौकशीनंतर इंद्राणीने आपणच शीनाला संपवलं असं सांगत गुन्हा कबूल केला. अजूनही मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि इंद्राणीची मुलगी विधी मुखर्जी यांची सध्या चौकशी सुरू आहे.

इंद्राणीचा कबुलीनामा

“शीना आणि मिखाईलमुळे मी खूप निराश झाले होते. ते माझ्या प्रगतीच्या आड येत होते. ती माझी मुलं होती. पण, त्यांच्यामुळे मला नेहमी मागं राहावं लागतं होतं. पीटरशी लग्न करून आणि यशाची शिखरे गाठून मी माझा भयानक भूतकाळ मिटवला होता. तोच ते पुन्हा माझ्या आयुष्यात आले. आणि त्यांनी मला अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. माझ्या आयुष्यात जे घडत होतं त्याच वाटेवर शीना होती. म्हणून मी तिला संपवलं.

मी शीनाला मारलं नसतं, तर एक दिवस माझ्यावरच मरण्याची वेळ आली असती. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि व्यक्ती हा माझ्या मर्जीप्रमाणे वागला पाहिजे, अशी माझी अपेक्षा होती. पण शीना तसं करत नव्हती. राहुलशी तिचे संबंध मला कधीच आवडले नाहीत. मी शीनाला राहुलपासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, शीना जास्तच राहुलच्या जवळ जाऊ लागली होती. मी शीनाचं आयुष्य खराब केलं, तिचं बालपण खराब केलं, असे आरोप नेहमी ती माझ्यावर करायची.

कित्येकदा या मुद्यांवरून आमच्यात भांडणंसुद्धा झाली. शेवटी ती वेगळी राहू लागली. तिच्या येण्यानं आणि वागण्यामुळे माझ्या सोसायटीत मला टोमणे खावे लागले. जे टोमणे मी आयुष्यभर खाल्ले ते पुन्हा नको होते. पीटरशी माझा संसार तर शीनाला अजिबात पटत नव्हता. शीनामुळे पीटर आणि माझ्यात खूप दुरावा निर्माण झाला होता. पीटरशी लग्नाआधी मी जे भोगलंय ते पुन्हा मला भोगायचं नव्हतं. शीना आणि राहुलच्या संबंधांमुळे पीटरही कमालीचे नाराज होते. त्यामुळे आमच्यात अनेकदा भांडणंही झाली. मला ही रोजची भांडणं नको होती. म्हणून मी शिनाला संपवलं.”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close