चिमुरड्याच्या मृत्यूने जग हेलावलं !

September 4, 2015 12:57 PM0 commentsViews:

04 सप्टेंबर : युरोपात एक अभूतपूर्व समस्या निर्माण झालीये. पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेत सुरू असलेल्या युद्धांमुळे हजारो
लोकांचे लोंढे युरोपात अनधिकृतपणे घुसतायत. त्यांना अटकाव करण्यासाठी युरोपीय देश पुरेपूर प्रयत्न करतायत. या संघर्षात अनेकांचे जीव जातायत. त्यातच एका चिमुरड्या निर्वासिताचा जीव गेला आणि त्याचे फोटो पाहून अवघं जग हेलावलं. 3 वर्षांच्या आयलानने संपूर्ण जगाला निर्वासितांच्या समस्येची दखल घ्यायला भाग पाडलंय.

alan kurdiटर्कीच्या किनार्‍यावरचं हे दृश्यं मन हेलावून टाकणारं आहे. हा चिमुकला मृतदेह आहे. सीरियातल्या आयलान कुर्दी या मुलाचा. तीन वर्षांचा आयलान आपल्या आई-वडील आणि भावासोबत युद्धाने वेढलेल्या सीरियातून एका होडीतून निघाला होता. पण त्यांची छोटीशी होडी टर्कीच्या किनार्‍याजवळ बुडाली. वाचले फक्त आयलानचे वडील अब्दुल्ला. बाकी सगळ्यांचे मृतदेह टर्कीच्या किनार्‍यावर लागले. हा फोटो इंटरनेटवर वायरल झाला. कोट्यवधी लोकांनी तो शेअर केला. जगभरातल्या मोठ्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आला. तो
आयलानच्या कॅनडात राहणार्‍या आत्यानेही पाहिला. युरोपात पोहोचल्यानंतर आयलनचं कुटुंब आत्याकडे कॅनडात जाणार होतं.

“आयलानच्या मृत्यूसाठी पूर्ण जग कारणीभूत आहे. निर्वासितांना मदत करणं आणि मुळात युद्ध थांबवणं जगासाठी अशक्य नाहीये.”
अशी व्यथा आयलानची आत्या टिमा कुर्दी यांनी मांडली.

आयलानच्या कुटुंबाप्रमाणेच रोज हजारो लोक सीरिया, इराक, लिबिया, जॉर्डन हे युद्धात होरपळत असलेले देश सोडून युरोपात घुसण्याचा प्रयत्न करतात. या सर्व देशांत सध्या आयसिसने उच्छाद घातलाय. आता जगायचं असेल, तर भूमध्य समुद्र ओलांडून युरोपात जायचं, अशी भावना इथे प्रबळ होतेय. हजारो निर्वासित येऊ लागल्यामुळे युरोपीय देश संकटात सापडलेत. ही निर्वासित मंडळी एक-एक देश पार करत पूर्ण युरोपात हातपाय पसरवत आहेत. हंगेरीत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सरकारने केला, तेव्हा हताश, संतापलेल्या निर्वासितांनी हिंसक निदर्शनं केली.

निर्वासितांना युरोपात थारा द्यायची की नाही, यावरून युरोपीय देशांमध्ये मतभेद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता ब्रुसेल्समध्ये युरोपीय महासंघाची तातडीची बैठक बोलवण्यात आलीये. आता या चिमुकल्या आयलानच्या मृतदेहाकडे पाहून तरी युरोपीय सत्तांना पाझर फुटेल का, हे पाहावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close