उपायुक्तांनी भाजपचे मनसुबे उधळले, 8 नव्हे 2 च दिवस मांसबंदी !

September 9, 2015 9:56 PM0 commentsViews:

mira bhiyandar_meatban09 सप्टेंबर : जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वात आठ दिवस मांसविक्रीवर आठ दिवस बंदी घालण्याचे भाजपचे मनसुबे पालिका उपाआयुक्तांनी उधळवून लावले. उपाआयुक्तांनी फक्त दोनच दिवस मांसविक्रीवर बंदी घालता येईल असे आदेशच जारी केले आहे. त्यामुळे भाजपच्या आठ दिवसांच्या मांस विक्रीवर बंदीचा प्रयत्न मोडीत निघालाय.

जैन धर्मिय या महिन्यात 11 ते 28 या दरम्यान पर्युषणाचे उपवास करत असतात. त्यामुळे या दरम्यान मांस विक्रीस बंदी घालावी, असा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने मांडला आहे. या प्रस्तावाला शिवसेनेसह, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला पण सत्तेची पॉवर दाखवत भाजपने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मीरा भाईंदरमध्ये आठ दिवस मांस विक्रीवर बंदीमुळे वाद निर्माण झाला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीने याला कडाडून विरोध केला.

अखेर आज या प्रकरणावर पालिका आयुक्तांनी पडदा टाकला. मीरा-भाईंदर महापालिकेच्या उपायुक्तांनी आज एक परिपत्रक काढलंय, ज्यामध्ये स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलंय की पर्युषण काळात 10 आणि 17 सप्टेंबर या दोन दिवशी महापालिका क्षेत्रात मांसविक्री बंद राहणार आहे.

या परिपत्रकामुळे आता मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजप यांच्यात चांगलीच जुंपलेली आहे. आठ दिवस मांसविक्री बंदीचा ठराव ज्यांनी मंजूर करवून घेतला तो सत्ताधारी भाजप अजूनही आठ दिवसांच्या बंदीवर ठाम आहे. आयुक्तांनी काढलेलं पत्र योग्य नाही. आम्हाला अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला. आम्ही जो ठराव लोकशाही पद्धतीने मांडला त्याचं काय केलं हे आयुक्तांना विचारणार अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर गीता जैन यांनी दिली.

विशेष म्हणजे, मीरा भाईंदर पाठोपाठ मुंबईतही मांस विक्रीवर आठ दिवस बंदीचा प्रयत्न भाजपकडून केला गेला पण तो वादात अडकणार या भीतीने भाजपने एक पाऊल मागे घेत तीन दिवसाचा प्रस्ताव मांडला. मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी प्रथेप्रमाणे याला चार दिवसांची मंजुरी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close