जैनांनो, मुसलमानांच्या मार्गाने जाऊ नका, शिवसेनेची तंबी

September 10, 2015 8:28 AM0 commentsViews:

uddhav on MeatBan

10 सप्टेंबर :  जैनांची याआधीही ‘पर्युषण’ पर्वं होतच होती, पण कत्तलखाने आणि मांसाहारबंदीची थेरं तेव्हा कुणाच्या डोक्यातून निघाली नव्हती. मग हे सर्व आताच हट्टाने का केले जात आहे? हीच धर्मांधता मुसलमानांच्या डोक्यात भिनली आणि तो हिंदू समाजाचा कायमचा शत्रू बनला. ‘पर्युषण’च्या नावाखाली महाराष्ट्राला डिवचू नका. ‘जगा आणि जगू द्या’ याच मंत्राप्रमाणे ज्याला जे खायचे आहे त्याला ते खाऊ द्या. उगाच अहिंसेची धार्मिक लुडबूड करू नका, असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.

सध्या राज्यात गाजतोय तो जैनांच्या पर्युषण पर्वावरून सुरू असलेला वाद. या काळात मांसविक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी जैन समाजाकडून होत आहे. त्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (गुरूवारी) सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून जैन समाजावर जोरदार टीका केली आहे. जैनांनो, मुसलमानांच्या मार्गानं जावू नका, या मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख लिहिला आहे.

मुंबई आणि आसपास राहणार्‌या ‘जैन’ बांधवांनी शाकाहार आणि मांसाहार यावर वाद निर्माण करून भूक चाळवली आहे. माणूस माणसाला खातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मांसाहार बंदीसाठी धार्मिक दांडिया खेळणे हे अमानुष आहे आणि एकप्रकारचा हिंसाचार आहे, असं प्रखड मत सेनेने मांडलं आहे.

जैन बांधव मोठ्या प्रमाणात बिल्डर व्यवसायात आहेत.ब्लॅक मनी घेणं ही पण एक प्रकारची हिंसाच आहे. मग पर्युषण पर्वात जैन बांधव काळ्या पैशांचे व्यवहार बंद करणार का? असा खोचक सवाल करत, मुंबईतल्या चाळीतून गरीबांना, मराठी मध्यमवर्गीयांना बाहेर काढलं जातं ही हिंसाच असल्याचं शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. जैनांना हिंदू म्हणवून घ्यायला लाज वाटते.आर्थिक ताकदीच्या जोरावर उद्योग नसतं. भूमिपुत्रांशी दुश्मनी घ्याल तर माती खाल, तुमचे आर्थिक साम्राज्य चुलीत घालायला वेळ लागणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी सामनातून दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close