अशीही ‘आदिशक्ती’, काम बंद तरीही देयकं लाटली !

September 10, 2015 8:48 PM0 commentsViews:

dhule44410 सप्टेंबर : धुळ्यात सध्या पोषण आहाराचा मुद्दा चांगलाच पेटलाय. धुळे जिल्ह्यातल्या कुसुंबा इथं आदिशक्ती महिला बचत गटाने काम बंद असताना ते सुरू असल्याचे दाखवून कामाची देयके लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत थेट मंत्रालयात महिला आणि बालकल्याण विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर प्रशासनाच्या विशेष पथकाने चौकशी केली.

धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील आदिशक्ती महिला बचत गटाने काम बंद असताना ते सुरू असल्याचे दाखवून देयके काढली आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी आढळणार्‍यंवर कडक कारवाई करावी, अशी तक्रार धुळे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य सुनील बैसाणे यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्त अनिता सिंघल यांच्याकडे केली होती. या तक्रारीची लागलीच दखल घेत विशेष पथकाचे गठन करून आदिशक्ती महिला बचत गटाची चौकशी करण्यात आली. याठिकाणी पोषण आहार निर्मितीच्या कुठल्याही खाणा खुणा दिसून आल्या नाहीत. कुसुंब्यातील युनिट स्थलांतरित केले जात असल्याचे सांगण्यात आले, दरम्यान युनिट बंद असताना पोषण आहाराचा पुरावठा केला जात होता का आणि तो कुठून आणि कसा केला जात होता याच्या चौकशीची मागणी बैसाणे यांनी केली आहे .

कोणत्याही क्षणी विशेष पथकाकडून बचत गटाची चौकशी होणार असल्याची पूर्वकल्पना मिळाल्याने बचत गट सुरू असलेल्या ठिकाणाहून साहित्य आणि सामुग्री संबंधितांकडून स्थलांतरित करण्यात येत होती. विशेष पथक चौकशीसाठी पोहोचण्या आधीच सर्व सारवासारव करण्यात आल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले , महिला व बालकल्याण विभागाच्या ज्या अधिकार्‍यांकडे बचतगट नियंत्रणाचे काम आहे तेच अधिकारी चौकशी दरम्यान उडवा उडवीची उत्तर देत होते.

अंगणवाडीतील मुलांना वेठीस धरून मनमानी पद्धतीने काम करणार्‍या या बचत गटांवर आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close