मक्केत क्रेन कोसळून 107 भाविक ठार

September 11, 2015 11:47 PM0 commentsViews:

macca accident11 सप्टेंबर :सौदी अरेबियातल्या मक्का शहरात शुक्रवारी रात्री एका मशिदीवर क्रेन कोसळून 107 जणांचा मृत्यू झालाय. तर 238 जण जखमी आहेत. हज यात्रेला सुरूवात होण्यास 10 दिवस आहेत, आणि त्याआधी ही घटना घडलीय. मशीद – अल – हरम या जगातल्या सर्वात मोठ्या मशिदीत ही भीषण दुर्घटना घडलीय.

मशिदीच्या बाहेर डागडुजीचं काम सुरू होतं, त्यासाठी अनेक अवाढव्य क्रेन्स तिथे होत्या. झालं असं की काल सकाळपर्यंत मक्केत कडक
ऊन होतं. पण दुपारी अचानक तिथे पावसाळी वातावरण झालं, मुसळधार पाऊस सुरू झाला आणि सोसाट्याचा वाराही होता. तब्बल 83 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं वारा वाहत होता. त्यानंतर तिथे धुळीचं वादळंच आलं. या हवेच्या जोरामुळे क्रेन्स मशिदीवर पडल्या. एक मोठी लाल रंगाची क्रेन मशिदीच्या छतावर कोसळली, आणि त्यामुळे छताचा काही भाग कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की बहुतांश लोक जागीच ठार झाले. काल शुक्रवार असल्यानं मशिदीत तुलनेनं जास्त भाविक होते. 50 बचाव पथकं आणि 86 रुग्णवाहिका लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. ह्या मशिदीचं इस्लाममध्ये खूप महत्त्व आहे. कारण इस्लाममधलं सर्वात पवित्र ठिकाण.. काबा..या मशिदीच्या आत आहे. आणि या काबाच्या भोवती भाविक प्रदक्षिणा घालतात. गेल्या वर्षी सौदीनं या मशिदीचा विस्तार हाती घेतला होता, आणि त्यामुळे इथं गेले अनेक महिने बांधकाम सुरू आहे. त्यासाठीच या मोठ्या क्रेन इथे आणल्या गेल्यात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close