थांबणे… ‘एकला चलो रे’चे!

September 12, 2015 5:20 PM0 commentsViews:

mahesh_mhatre_ibnlokmat- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

‘चालणे’ तुमच्या-माझ्या जगण्यातील अत्यावश्यक कृती…प्रगती या शब्दाचा आणि स्थितीचा थेट चालण्याशीच संबंध असतो कारण, प्रगती या शब्दातच ‘गती’ अंतर्भूत अभिप्रेत असते तर असे हे फक्त शारीरिक असत नाही. मानसिक पातळीवर आपण अखंड आणि अथकपणे चालत असतो. ते चालणे असते आपल्या श्रेयाच्या दिशेने, इच्छापूर्तीच्या दिशेने.

अगदी गरीब असो वा श्रीमंत, सगळेच हा प्रवास करीत असतात, आयुष्याच्या अंतापर्यंत. म्हणून ‘चालणे’ ही जेवढी अपरिहार्य क्रिया आहे. तेवढेच योग्य वेळी थांबणेही आवश्यक असते. कारण थोडा विसावा, क्षणभर विश्रांती, पुढील प्रवासासाठी ऊर्जा देणारी असते. त्याच काळात आपण आधी केलेल्या वाटचालीचे मूल्यमापन, सिंहावलोकन करू शकतो आणि पुढील प्रवासाची आखणीही करू शकतो. ‘एकला चलो रे’चे हे थांबणे त्यासाठीच आहे.

‘एकला चला रे’ विख्यात समाजसेवक डॉ.बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभाच्या दिवशी 27 डिसेंबर 2014 सुरू झालेला आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीवरील एक कार्यक्रम होता. पण गेल्या दहा महिन्यांत तो अवघ्या मराठी मनात सकारात्मक भाव जागवणारा उपक्रम बनला.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात टीआरपी वगैरेचे जे लौकिकार्थाने मानले जाणारे मानदंड असतात ते या कार्यक्रमाने अगदी लीलया ओलांडून टीव्ही पत्रकारितेत सकारात्मक गोष्टींनाही ‘मार्केट’ असते, हे सिद्ध केले. म्हणून ‘एकला चलो रे’ एक ब्रँड बनण्याऐवजी लोकभावना व्हावी अशी आकांक्षा आहे. या कार्यक्रमाद्वारे समाजासमोर आलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या जगण्याच्या प्रेरणा अवघ्या मराठी तरुणाईच्या दिशादर्शक बनाव्यात अशी अपेक्षा आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने अवघ्या मराठी मुलखात उसळलेला सकारात्मक उर्जेचा दरवळ असाच कायम राहो, ही सदिच्छा आहे.

ekla chalo re_maesh_mhatre_ibnlokmat‘एकला चलो रे’ चा प्रवाह टीव्हीला छोट्या पडद्यावरून समाजपटलावर अवघ्या काही आठवड्यांतच प्रतिबिंबित झाला आणि पुढे लोकप्रियही झाला. त्याचे श्रेय मुलाखतकार म्हणून मला मिळाले. अगदी देशा-विदेशात फिरताना, दुर्गम खेड्या-पाड्यात वावरताना त्याची वारंवार प्रचिती येते. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाच्या आरंभापासून आजपर्यंत, अनेकांनी अनेक प्रकारे मदत केली.

म्हणूनच ‘एकला चलो रे’ चा प्रवास सहज आणि सुरळीत झाला. या प्रवासात असंख्य माणसे भेटली. त्यांच्या जगण्या, वागण्या, बोलण्याने जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाने मला आणि माझ्या सहकार्‍यांना समृद्ध केले…आज या स्फूर्तिदायी वाटचालीचे सिंहावलोकन करताना मागे वळून पाहताना जेवढे समाधान आहे, तेवढ्याच नव्या कार्यक्रमांच्या, नव्या संकल्पना खुणावत आहेत. नव्या वाटेच्या दिशेने, ‘एकला चलो रे’ चा प्रवास सुरूच राहील .अथक आणि अखंड!

Ekla chalo reगेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘एकला चलो रे’ ची संकल्पना मला सुचली आणि त्यानंतर सुरू झाली जुळवाजुळव. अगदी या कार्यक्रमाचे नाव ठरवल्यापासून तर माणसे शोधण्यापर्यंतची तयारी आणि मग प्रत्यक्ष शूटिंगची वेळ… प्रत्येक मुलाखतीत नवे अनुभव आणि पडद्यामागील गमतीजमतीच्या शिदोरीवर ही संकल्पना विस्तारली. या सार्‍या प्रवासाचे वर्णन अर्थात ‘मेकिंग ऑफ एकला चलो रे ‘ वाचा दर आठवड्याला माझ्या ब्लॉगवर…

Follow us on twitter : @MaheshMhatre

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close