स्पेशल रिपोर्ट : मुंबई कोर्टातील अन्यायाच्या खाणाखुणा हटवा !

September 12, 2015 8:37 PM0 commentsViews:

 विनोद राऊत,मबई

12 सप्टेंबर : मुंबई हायकोर्टाच्या आवारात आजही तुम्हाला अनेक ब्रिटीश न्यायाधीशांचे फोटो, पुतळे दिमाखात उभे दिसतील. यातील अनेकांनी टिळक, महात्मा गांधींपर्यंत अनेक देशभक्तांवर अन्याय केला. त्यामुळे अन्यायाच्या या खाणाखुणा इथून हटवा अशी मागणी काही कायदेतज्ञांकडून होत आहे.

mumbai high court434मुंबई हायकोर्ट….या कोर्टात देशातील अनेक नामवंतांनी प्रॅक्टीस केली. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक प्रखर देशभक्तांवर या कोर्टात खटले चालले. शिक्षाही झाली, त्यात एक नाव होतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक …1908 मध्ये टिळकांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली. जस्टीस डावर यांनी हा निकाल दिला होता. मात्र अनेकांच्या मते हा निर्णय पूर्णपणे पक्षपाती होता.

अनेकांना माहिती नसेल मात्र त्यावेळी टिळकांचं वकीलपत्र घेतलं होतं बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी…तब्बल 6 वर्षांनंतर डावर यांना ब्रिटीश सरकारनं नाईट पदवी बहाल केली. त्या समारंभाला न जाण्याचा बाणेदारपणा बॅरिस्टर जिना यांनी त्यावेळी दाखवला होता.

मुंबई हायकोर्टाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश छागला यांच्या ” रोजेस इन डिसेंबर” या आत्मचरित्रातही याचा स्पष्ट उल्लेख आहे. छागला यांनी त्यांच्या कार्यकाळात ही चूक दुरुस्त करत…हायकोर्टात टिळकांच्या ऐतिहासिक उद्गारांची कोनशिला बसवून घेतली होती…न्यायाधीशांचं 40 क्रमांकाच हे चेंबर बघा, आजही जस्टीस डावर यांचा फोटो तुम्हाला लागलेला दिसेल. अप्रत्यक्षपणे का होईना पण आजही डावर यांना अभिवादन करावं लागतं.

हायकोर्टाच्या आवारात प्रवेश केल्यावर हा पुतळा दिसतोय..तो जस्टीस दिनशा मुल्ला यांचा आहे..मुल्ला यांनीच महात्मा गांधी यांची बॅरिस्टरची सनद रद्द केली होती. हा पुतळा हटवा अशी मागणी पुढे येत आहे. हायकोर्ट इमारतीच्या देखभालीचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. त्यामुळे पीडब्लुडीने या बदलासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी कायदेतज्ञांची आहे.

या ऐतिहासिक चुका दुरस्त करुनही आपण आपली मानसिकता सुधारणार आहोत का हा प्रश्न आहेच….मात्र या निमित्तानं बॉम्बे हायकोर्टाच्या ऐतिहासिक पंरपरेला उजाळा मिळतोय तेही काय थोडके नाही…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close