विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला नव्हता ?

September 14, 2015 11:33 PM0 commentsViews:

 

14 सप्टेंबर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचं गूढ अनेक दशकानंतर आजही कायम आहे. आतापर्यंतच्या सरकारांनीही त्यांच्याबद्दलची कागदपत्रं खुली करायला नकार देऊन हे गूढ आणखी वाढवून ठेवलंय. पण पश्चिम बंगाल सरकार आता नेताजींशी संबंधित काही कागदपत्रं खुली करणार आहे. आणि त्यातून धक्कादायक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यातली काही कागदपत्रं आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागली आहेत. त्यानुसार 1945 मध्ये विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झालाच नव्हता. सरकारनं 1948 मध्ये नेताजींच्या कुटुंबीयांना पाठवलेल्या पत्रातही नेताजी जिवंत असल्याची शक्यता व्यक्त केली होती.subhash chandra bose

1945 पासून सक्रिय जीवनातून गायब….अखेरचं दर्शन 18 ऑगस्ट 1945….ठिकाण तायव्होकू, पूर्वीचं तैपेई म्हणजेच आताचं तैवान…
स्वातंत्र्योत्तर भारतातलं एक अतिशय मोठ्या रहस्याबद्दलचे काही सुगावे आता मिळतायत..नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलचे काही अतिशय महत्त्वाचे क्लासिफाईड डॉक्युमेंट्स आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलेत. ही कागदपत्रं आहेत.1947 ते 1968 या दरम्यान नेताजींशी संबंधित झालेल्या सरकारी पत्रव्यवहारांची…पश्चिम बंगाल सरकार नेताजींशी संबंधित 64 फाईल्स लवकरच खुली करणार आहे. त्यातली ही काही कागदपत्रं आहेत.

त्यातलं पहिलं कागदपत्र आहे. हावडाच्या तत्कालीन जिल्हा गुप्तचर विभागाचा गुप्त अहवाल..29 एप्रिल 1949 मधला…या अहवालात कलकत्ताच्या स्पेशल पोलीस अधीक्षक नेताजींच्या ठावठिकाणाबद्दलचा दाखला देतायत…त्यांनी म्हटलंय..

- 1945 मध्ये विमान दुर्घटनेत नेताजींचा मृत्यू झाला यावर ब्रिटीश आणि अमेरिकी गुप्तचर संस्थांचा विश्वास नाही
– तुर्कस्थानमधल्या ब्रिटीश दूतावासाकडून ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाला पाठवलेलं हे पत्र आहे.
– मृत्यूच्या बातमीच्या 4 वर्षानंतरही ब्रिटीश आणि अमेरिकन गुुप्तचर संस्थांना हा ठाम विश्वास होता की आग्नेय आशिया आणि पूर्वेतल्या प्रत्येक कम्युनिस्ट उठावामध्ये नेताजींचाच हात आहे.
– इतकंच नाही तर नेतांजीचं रशियामध्ये प्रशिक्षण सुरू आहे. आणखी एखादा टिटो, दिमित्रॉव किंवा माओ बनण्यासाठी
– 1945 मध्ये विमान अपघातात नेतजींचा मृत्यू झाला आणि त्यांच्यावर लष्करी इतमामात टोकियोत अंत्यसंस्कार करण्यात आले, याचा एकही पुरावा अँग्लो-अमेरिकन सुरक्षा संस्थांना देता आला नाही.
– नेताजी जिवंत आहेत आणि भारतात परतण्याच्या योग्य संधीची वाट पाहत आहेत, अशा खात्रीशीर बातम्यांमुळे ब्रिटीश सरकार अस्वस्थ आहे.
– नेताजींचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात त्यांचे जवळचे सहकारी हबीबूर रहमान यांनी दिलेल्या जबाबाचा महत्त्वाचा वाटा होता.
– विमानाला अपघात झाला तेव्हा आपण नेताजींसोबतच होतो, असा दावा रहमान यांनी केला होता.

या अहवालात असंही म्हटलंय की, “नेताजींच्या मृत्यूबद्दल अनेक परस्परविरोधी दावे केल्यानंतर रहमान यांनी नेताजी जिवंत आहेत आणि ते लवकरच परततील असा विश्वास व्यक्त केला होता.”

आयबीएन-नेटवर्कच्या हाती आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र लागलंय…ते आहे 5 मार्च 1948 मधलं…नेताजींचा पुतण्या अमेयनाथ बोस यांना…दिल्लीतल्या कुआंग नावाच्या व्यक्तीनं दिल्लीतल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातल्या प्रकाशन विभागातून लिहिलं होतं..
नेताजींच्या घरात पोहोचण्यापूर्वी या पत्राची कलकत्त्यातल्या एल्गिन रोड पोस्ट ऑफिसमध्ये गुप्तचर संस्थांकडून छाननी करण्यात आली होती. त्यामुळेच आपल्यावर हेरगिरी करण्यात येत असल्याचा आरोप नेताजींच्या कुटुंबीयांनी केला होता.

अमेय बोसला लिहिलेल्या या पत्रात कुआंग म्हणतात, “मला खेद वाटतो की, काही काळापूर्वी चिनी वृत्तपत्रात नेताजींबद्दल आलेल्या बातमीची मी शहानिशा करू शकलो नाही..मला अजूनही असा विश्वास आहे की नेताजी जिवंत आहेत.”

नेताजींशी संबंधित या फाईल्स पश्चिम बंगाल सरकार लवकरच खुल्या करणार आहे. आणि त्यामुळे नेताजींचं नेमकं काय झालं, हा अनेक भारतीयांना भेडसावणारा यक्षप्रश्न सुटायला मदत होईल, अशी आशा आहे.

या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होताहेत.

प्रश्न 1. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला होता तर नेहरू सरकारनं त्यानंतर दशकभरानं नेताजींच्या कुटुंबावर पाळत का ठेवली?

प्रश्न 2. नेताजींचा मृत्यू 1945मध्ये विमान अपघातात झाल्याची नेहरू सरकारला खात्री नव्हती का?

प्रश्न 3. टोकियोमधल्या रेन्कोजी मंदिरातून नेताजींचे कथित अवशेष परत आणण्यासाठी कोणत्याही सरकारनं काहीही प्रयत्न का केले नाहीत?

प्रश्न 4. नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला नसेल तर ते गूढरीत्या कुठे गायब झाले?

प्रश्न 5. स्वातंत्र्यानंतर नेताजी कधी भारतात परत आले का?

प्रश्न 6. अधूनमधून चर्चा होणार्‍या गुमनामी बाबाबद्दलचं नेमकं सत्य काय आहे?

प्रश्न 7. या खुलाशानंतर सरकारच्या ताब्यात असलेल्या नेताजींविषयीच्या 130 फायली खुल्या करण्यासाठी सरकारवर काही दबाव येईल का?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close