पुण्यात आज कृत्रिम पावसाचा प्रयोग

September 16, 2015 10:42 AM0 commentsViews:

Cloud Seeding

16 सप्टेंबर : पुण्यात आज कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असून, त्यासाठी लोहगाव विमानतळावरून दुपारी विमानाचे उड्डाण होणार आहे. ढगांची अनुकूलता पाहून दुपारी एकच्यानंतर कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरूवात होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणक्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यातच गेल्या दिड महिन्यांहून अधिक काळ या भागातून पाऊस गायब झाल्याने धरणाच्या पाणीसाठयात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडय़ात चांगला पाऊस पडत असताना. पश्चिम महाराष्ट्रात मात्र, अजुनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 27 कोटी रूपयांचा खर्च येणार असून, सरकारने एका कंपनीसोबत करारही केला आहे.

सध्या सायंकाळच्या वेळी पुणे परिसरात पाऊस पडत आहे. असे असले तरी अनुकूल ढग पाहून हा प्रयोग करण्यात येईल. घाटमाथा परिसरातील जुन्नर, मावळ, भोर, वेल्हा या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे पाणीकपातीच्या संकटाचा सामना करणार्‍या पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close