भाजपला दणका, बिहारमध्ये शिवसेना 150 जागा लढवणार

September 21, 2015 8:53 AM0 commentsViews:

Uddhav Thackeray BEST

21 सप्टेंबर : बिहारची रणधुमाळी दिवसेंदिवस आणखीनच रंगतदार होत चालली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये 150 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मित्रपक्ष असलेला भाजपसोबत शिवसेना साथ देण्याऐवजी स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 150 उमेदवार उतरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जवळपास तयार असून आज (सोमवारी) पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. हिंदी पट्‌ट्यामध्ये राजकीय स्थैर्य आणण्यासाठी शिवसेनेने स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचं पक्षातर्फे सांगण्यात येत आहे. भाजपशिवाय निवडणूक लढवीत असल्याबाबत विचारल्यावर, उत्तर भारतात शिवसेनेचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं राऊत म्हणाले.

शिवसेना हिंदुत्व, गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मिती या मुद्दय़ांवर निवडणूक लढवत आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून नितीश-लालू आणि काँग्रेस यांच्या युतीचं आणि भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांचं कडवं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 12 ऑक्टोबरपासून पाच टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये भाजप 160 जागांवर, रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 40 जागांवर, उपेंद्र कुशवाहचा आरएसएलपी पक्ष 23 तर माजी मुख्यमंत्री जीनत राम मांझींचा हिंदुस्थान आवाम मोर्चा 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close