हिंदुत्वाला बदनाम करणार्‍या सुपार्‍या वाजवू नका, शिवसेनेचा इशारा

September 21, 2015 11:43 AM0 commentsViews:

uddhav on MeatBan

21 सप्टेंबर : एकीकडे पानसरेंच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर राज्यभरातून सनातनवर बंदीची मागणी होत असताना शिवेसेनेने मात्र सनातनची पाठराखण केली आहे. पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी शोधायलाच हवे. पण पुरोगामी ढोंगी बाबांना खूश करण्यासाठी कुत्र्याचे माकड करून तपासाचा बोकड करू नका. खर्‍या गुन्हेगारांना सोडू नका, पण हिंदुत्वाला बदनाम करणार्‍या सुपार्‍या वाजवू नका, असं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. पुरोगाम्यांना खुश करण्यासाठी हिंदूत्वाला टार्गेट करू नका असा इशाराही लेखात देण्यात आला आहे.

गायकवाड हा ‘सनातन’चा साधक असून नसंस्थेच्या अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात त्याचा सहभाग आहे या कारणास्तव त्याला विनाचौकशी फासावर लटकवा आणि सनातनवर बंदी घाला अशा मागणीची डबडी वाजू लागली आहेत. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे आणि स्वत:स पुरोगामी वगैरे म्हणवून घेणार्‍यांचे ढोंग उघडे पाडणारा असल्याचं सामनातून म्हटलं आहे. तसचं सनातनवरच्या बंदीचा मागणीचीही निषेध करण्यात आला आहे.

काय म्हटलंय ‘सामना’च्या अग्रलेखात?

‘सनातन’वर बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे आणि अशी मागणी करणारी थोबाडे तीच तीच आहेत. कोल्हापूरचे गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगलीतून समीर गायकवाड या तरुणास अटक झाली. गायकवाड हा ‘सनातन’चा साधक आहे. ‘सनातन’च्या अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात त्याचा सहभाग आहे या कारणास्तव गायकवाडला विनाचौकशी फासावर लटकवा आणि ‘सनातन’वर लगेच बंदी घाला अशा मागणीची डबडी वाजू लागली आहेत. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे आणि स्वत:स पुरोगामी वगैरे म्हणवून घेणार्‍यांचे ढोंग उघडे पाडणारा आहे.

पानसरे यांनी शिवाजीराजांविषयी वेगळी भूमिका घेतली म्हणून त्यांची हत्या झाली अशी काव काव काही पुरोगाम्यांनी केली. खरे तर अशी बडबड करून ते रोज पानसरे यांचे वैचारिक श्राद्ध घालत आहेत. पुन्हा गंमत अशी की हेच पुरोगामी लोक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मिळणार्‍या धमक्यांबाबत मात्र तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसले होते. हे ढोंग आहे आणि आता पानसरे हत्याप्रकरणात सनातनवर बंदी घालण्यासाठी हेच सर्व ‘निधर्मी’ म्हणवून घेणारे हिंदूंचेच देव पाण्यात घालून बसले होते.

‘सनातन’चा एक साधक संशयित म्हणून पकडला, पण पहिल्या दिवसापासून पानसरे हत्या प्रकरणात फक्त ‘सनातन’ किंवा इतर हिंदुत्ववादी लोक आहेत याच दिशेने तपास झाला आणि तपासकर्त्यांना त्या दिशेने जाता यावे असा माहौल निर्माण केला हे पानसरे आणि दाभोलकरांच्या खर्‍या खुन्यांचे यश मानावे लागेल. पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी आणि त्यामागचे सत्य शोधायलाच हवे. पण पुरोगामी ढोंगी बाबांना खूश करण्यासाठी कुत्र्याचे माकड करून तपासाचा बोकड करू नका. खर्‍या गुन्हेगारांना सोडू नका, पण हिंदुत्वाला बदनाम करणार्‍या सुपार्‍या वाजवू नका!

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close