जेएनपीटीजवळच्या टोलनाक्यावर पोलिसांची अवैध टोलवसूली

January 13, 2010 1:09 PM0 commentsViews: 1

13 जानेवारी नवी मुंबईतल्या जेएनपीटीजवळील जासई टोलनाक्यावर पोलिसच अवैध पद्धतीने खुलेआम टोलवसूली करत असल्याचं आयबीएन-लोकमतने उजेडात आणलं आहे. तिथे पोलीस स्व:त पैसे घेत नाहीत. या ठिकाणी त्यांनी काही माणसं टोल गोळा करण्यासाठी नेमली आहेत. ये-जा करणारे ट्रक, टेम्पो, कंटेनर या वाहनांच्या चालकांकडून दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत अवैध टोलवसूली केली जाते. कोणताही माणूस टोलनाक्यावर उभा राहिला आणि त्याने हात वर केला की, त्याच्या हातात पैसे टेकवायचे हा एकच फतवा आहे. ट्रकचालक या अजब नियमाप्रमाणे त्याच्या हातात पैसे टेकवतात. पैसे दिले नाही तर ट्रकवाल्यांना पुन्हा मागे फिरण्यास सांगितलं जातं. आणि या रस्त्याने प्रवेश दिला जात नाही. याबाबत संबधित पोलीस आणि अवैध टोल वसूलीत सामील असलेल्यांना आयबीएन -लोकमतच्या टीमने जेव्हा जाब विचारला तेव्हा त्यांनी या ठिकाणाहून पळ काढला.

close