सनातनवर अशी घातली जावू शकते बंदी !

September 22, 2015 11:36 PM0 commentsViews:

विवेक कुलकर्णी , मुंबई.

22 सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर सनातनवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीनं पुन्हा एकदा जोर धरलाय. कोणत्याही संघटनेवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधात्मक कायदा, 1967 नुसार बंदी घालण्यात येते. ही बंदी घालण्यासाठी या कायद्यात काय तरतुदी आहेत आणि सनातनवर बंदी घालण्याबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे याबद्दलचा हा रिपोर्ट.

pansare_case_sameer_gaikwadजेव्हा एखाद्या संघटनेवर बंदी घालण्याचा विचार कोणतेही सरकार करतं त्यावेळी अनेक गोष्टींचा विचार सरकारला करावा लागतो. जेव्हा देशविरोधी, समाजाविरोधी किंवा घटनेविरोधात कृत्य केल्याबद्दल सारखं एकाच संघटनेचं नाव सातत्यानं समोर येतं किंवा त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना अटक होते, तेव्हा त्या संघटनेवर बंदीची शिफारस राज्य सरकार केंद्राला करू शकतं.

बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधात्मक कायदाच्या नेमक्या तरतुदी काय आहेत ?

- घटनास्थळीचे पोलीस आयुक्त किंवा अधीक्षक आपला अहवाल राज्याच्या गृह विभागाला पाठवतात
– राज्य सरकार आपला अहवाल केंद्र सरकारला पाठवतात
– आढाव्यानंतर केंद्र राज्यानं शिफारस केलेली बंदी मंजूर करतं
– गॅझेटमध्ये नोटिफिकेशनद्वारे अशा संघटनेला बेकायदेशीर घोषित केलं जातं
– नोटिफिकेशमध्ये कोणत्या कारणांमुळे संघटनेवर बंदी घालण्यात आली याची कारणं दिली जातात
– नोटिफिकेशन काढल्याच्या दिवसानंतर ही बंदी 2 वर्षांसाठी लागू होते
– 2 वर्षांनंतर केंद्र सरकार आढावा घेऊन ही बंदी वाढवू शकते
– बंदी आलेल्या संघटनांच्या आर्थिक व्यवहारांवरही बंदी
– बंदी असलेल्या संघटनेची कार्यालयं बंद करण्यात येतात
– बंदी असलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू ठेवल्यास अटक होऊ शकते
– बंदी घातलेल्या संघटनेचा प्रचार कोणी करत असल्यास तुरुंगवास

सनातन संस्थेच्या कारवाया, त्यांच्या कार्यकर्त्यांना झालेली अटक आणि सनातन प्रभातमधून छापून येणार विखारी लिखाण बघता सनातनवर बंदी घालण्यात यावी असं मत माजी माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी व्यक्त केलँय. तर सनातनवर बंदी घालता येणार नाही कारण कोर्टात प्रकरण टिकणार नाही असं मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय.

आता पानसरे हत्या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर येत आहे आणि त्यावर सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close