स्पेशल रिपोर्ट : उच्चशिक्षित तरुण माओवाद्यांच्या रडारवर

September 23, 2015 11:58 AM0 commentsViews:

महेश तिवारी, गडचिरोली

23 सप्टेंबर : माओवादी चळवळ ही सुरवातीला बंडखोर उच्चशिक्षितांच्या जीवावरच उभी राहिली होती. पण मध्यंतरीच्या काळात हीच चळवळ आपल्या मूळ उद्देशापासून भरकटली आणि या चळवळीकडे आकर्षित झालेल्यांचा मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झाला. म्हणूनच माओवाद्यांनी उच्चशिक्षितांना चळवळीकडे आकर्षित करण्यासाठी पुन्हा विशेष प्रयत्न सुरू केलेत.

तेलंगणाच्या वारांगल जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पोलिसांसोबतच्या चकमकीत श्रुती नावाची माओवादी तरुणी ठार झाली. इथपर्यंत ही तशी साधारणच बातमी होती, पण जेव्हा श्रुती एमटेक द्विपदवीधर असल्याचं कळलं तेव्हा अनेकांच्या भुंवया उंचावल्या. बरं ही श्रृती काही आदिवासी तरुणी देखील नव्हती, त्यामुळे ती माओवादी असण्याचा कुणालाच संशयही आला नव्हता. मग ही चांगल्या घरातली आणि उच्चशिक्षित तरुणी माओवादी चळवळीकडे नेमकी कशी आकर्षित झाली असा अनेकांना प्रश्न पडला असेल. तर त्याचं उत्तर वारांगल माओवाद्यांच्या बेस कॅम्पमध्ये सापडतं. सूत्रांच्या माहितीनुसार तेलंगणातलं प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या वारगंल जिल्ह्यात माओवाद्यांनी उच्चशिक्षितांना पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे. त्यांच्यासाठी विशेष भर्ती कॅम्पही लावले जातात म्हणे. कारण माओवाद्याचंं प्रमुख केंद असलेल्या तेलंगणातच मध्यंतरी ही चळवळ काहीशी खिळखिळी झाली होती. म्हणूनच माओवाद्यांनी पुन्हा एकदा उच्चशिक्षितांना आपल्याकडे खेचण्याचे विशेष प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातंय.

MAOWADI 1213

गेल्या आठवडयात वारांगल पोलीसांच्या चकमकीत ठार झालेली श्रुती ही एमटेक पर्यंत शिकलेली उच्चशिक्षीत तरुणी असून तिच्यासोबत ठार झालेला तरुण माओवादी विद्यासागर पदवीधर असल्याचं उघड झालं. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा हादरुन गेल्या आहेत. गेल्या महियात छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत विवेक नावाचा वकीलीचं शिक्षण पुर्ण करणारा माओवादी ठार झाला होता. या विवेकने माओवादी चळवळीत उच्चशिक्षीत तरुणाईला आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गेल्या वर्षभरात जवळपास चाळीस सुशिक्षीत तरुण तरुणी माओवादी चळवळीत दाखल झाले.एकटया वारंगल जिल्हयातूनच 25 तरुणांचा समावेश असल्याचं कळतंय.

तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रातही उच्चशिक्षीत शहरी तरुण चळवळीकडे गेल्याचं पोलीस अधिकारी मान्य करतायत. अगदी पुण्यातही मध्यंतरी माओवाद्यांची भित्तीपत्रकं आढळून आली होती. तीही पुणे थेट पत्रकार संघात. एवढंच काय मध्यंतरी काही माओवाद्यांनाही पुणे परिसरातून अटक झाली होती. थोडक्यात महाराष्ट्रातही माओवाद्यांंनी आपला मोर्चा आता शहराकडे वळवल्याचं दिसतंय.

माओवादी चळवळीचं नेतृत्व एकेकाळचा प्राध्यापक असलेल्या मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपतीकडे असून गेल्या 35 वर्षांपासून संपूर्ण माओवादी आंदोलनाचं नेतृत्व तेलंगाणातल्या माओवाद्यांकडे आहे. एकेकाळचा तेलंगाणातला ढासळलेला बालेकिल्ल्यात चळवळीला मजबूत करण्यासाठी तेलंगाणातला तरुणाईकडे माओवाद्यांनी लक्ष केंदि्रत केलंय.

बंदुकीच्या नळीतून क्रांती घडविण्यासाठी चारू मुजूमदार यांनी सुरू केलेली ही माओवादी चळवळ व्हाया विदर्भ थेट बस्तरपर्यंत पसरलेली आहे. पण आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर यांनी कठोर कारवाई करून तेलंगणातच चळवळीचं कंबरडं मोडून काढलं होतं. परिणामी बेस कँप असलेल्या तेलंगणात माओवादी चळवळ अस्तित्वहिन झाली होती. म्हणूनच उच्चशिक्षित तरुणाईला पुन्हा आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाल्यंचं दिसतयं.

तेलंगाणा नवं राज्य अस्तित्वात आल्यास माओवाद वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. अर्थात परिस्थिती अगदीच तशी झाली नसली तरी माओवादी चळवळीकडे तेलंगाणातल्या सुशिक्षित तरुणाई काही प्रमाणात आकर्षित झाल्याचं एमटेक श्रुतीच्या चकमकीवरून सिद्ध झालंय. म्हणूनच या बातम्यांनी सरकार आणि सुरक्षा दलासमोर आव्हान उभ केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close