‘पानसरेंना मी संपवलं…’, फोन कॉल्समुळे समीर जाळ्यात !

September 23, 2015 5:36 PM0 commentsViews:

sameer_gaikwad_pansarecase_arrest23 सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाड फोन कॉलमुळे पोलिसांच्या गळाला लागला. समीरची मैत्रीण असलेल्या ज्योती कांबळे हिच्याशी समीरने फोनवरून केलेल्या संभाषणावरून त्याला अटक करण्यात आली आहे. या संभाषणात त्याने पानसरेंच्या खुनाचा उल्लेख केलाय. ‘पानसरेंना मी कसं संपवलं हे माहीत आहे ना तुला’, असं तो दोन वेळा बोललाय. कोल्हापूर सत्र न्यायालयाने आज समीरला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

समीरच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे पोलिसांच्या हाती लागले आहे. महत्त्वाचं म्हणजे समीरचे रुद्रगौडा पाटील या मडगाव बॉम्बस्फोटातल्या फरार आरोपीशीही संबंध होते. समीरची गुजरातच्या वैद्यकीय लॅबकडून ‘सस्पेक्ट डिटेक्शन टेस्ट’ करण्यात आली. त्यातही समीर संशयास्पद आढळलाय. त्याची मानसोपचार तज्ञाकडूनही तपासणी करण्यात आलीय. शिवाय समीरने कोल्हापूरबाहेर अनेक कॉल्स केलेत. त्या सर्व व्यक्तींचीही चौकशी करायची आहे. या सर्व कारणांमुळे समीरला आणखी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर समीरच्या बचावासाठी 31 वकिलांची फौज तैनात करण्यात आली होती. त्याच्या वकिलांनीही तब्बल 50 मिनिटं युक्तीवाद केला. रुद्रगौडा पाटील हा समीरचा मोबाईल दुकानाचा पार्टनर आहे, त्यामुळे दोघांचे संबंध आहे, असं समीरच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. जे काही पुरावे आहेत त्यावरून समीर पानसरे हत्येच्या कटात सहभागी असल्याचं स्पष्ट होत नाही, असा बचाव समीरच्या वकिलांनी केला. पण कोर्टाने समीरला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिलीय. शिवाय आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर समीरशी बोलता यावं, अशी विनंतीही केली पण कोर्टाने फेटाळली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close