अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी

January 16, 2010 9:04 AM0 commentsViews: 29

16 जानेवारी पुण्यात होणार्‍या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ समीक्षक द.भि. कुलकर्णी यांची निवड झाली आहे. औरंगाबाद इथे झालेल्या मतमोजणीनंतर द.भि. कुलकर्णी यांची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. कुलकर्णी यांना 350 मतं पडली आहेत. तर त्यांचे प्रतीस्पर्धी प्रेमानंद गजज्वी यांना 224 मतं मिळली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतपत्रिका पाठवण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस होता. 790 पैकी 591 मतदारांनी मतपत्रिका पाठवून मतदान केल होतं. त्यानंतर शनिवारी मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील यांनी द.भि. कुलकर्णी यांची निवड झाल्याचं जाहीर केलं.द.भि.कुलकर्णी यांची कारकीर्ददत्तात्रय भिकाजी कुलकर्णी यांचा जन्म 25 जुलै 1934 ला नागपूर इथे झाला. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही नागपूर इथे झालं. नागपूर विद्यापीठाची पीच.डी मिळवली तसंच साहित्य वाचस्पती ( डी. लिट. समकक्ष पदवी ) मिळवली. त्यांनी साहित्यशास्त्र, संशोधनात्मक, समीक्षात्मक अशा विविध विषयात 36 ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यात प्रामुख्याने महाकाव्य :स्वरुप व समीक्षा, ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, तिसर्‍यांदा रणागंण, मर्ढेकरांचे सौदर्यशास्त्र: पुन:स्थापना, दोन परंपरा, चौदावे रत्न, पहिल्यांदा रणांगण, समीक्षेची वल्कले यांचा समावेश आहे. द.भि. कुलकर्णी यांना विविध प्रकारचे पुरस्कार आणि शैक्षणिक सन्मानही मिळाले आहेत. यामध्ये नागपुर विद्यापीठातर्फे कै. ना. के. बेहरे सुवर्णपदक, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्र आणि परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला आहे. नागपुर, पुणे, उस्मानिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक ग्रंथाचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. 'अंतरिक्ष फिरलो पण' या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्:मय पुरस्कार मिळाला आहे.

close