मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भाजप पदाधिकार्‍याची गुंडगिरी, प्राध्यापकाची पेटवली कार

September 25, 2015 5:21 PM0 commentsViews:

napur gunda25 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात सध्या चाललंय काय असा प्रश्न पडतोय. नागपूरचा कुख्यात गुंड आणि भाजपचा पदाधिकारी सुमित ठाकूर याने एका क्षुल्लक कारणावरून एका प्राध्यापकाची कार पेटवून दिलीये. मल्हारी मस्के असं या प्राध्यापकाचं नाव आहे.

घडलेली हकीकत अशी की, काही दिवसांपूर्वी प्राध्यापक मल्हारी मस्के यांचा गाडीचा धक्का सुमित ठाकूरच्या गाडीला लागला होता. यातून झालेल्या वादानंतर सुमितने मस्के यांच्या घरावर हल्ला केला होता. घाबरलेल्या मस्के यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत केली नव्हती. काल रात्री सुमितने पुन्हा म्हस्के यांच्या घरी उभी असलेली त्यांची कार पेटवून दिली. सुमित हा भारतीय जनता युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे. सुमीतवर यापूर्वीही मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. सध्या सुमित फरार आहे.

प्राध्यापक मल्हारी मस्के यांनी गुंड सुमीत ठाकूर आणि त्याचा भाऊ अमित ठाकूर याला अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपण पोलिसांत तक्रार करू नये म्हणून सुमीतच्या वडीलांनी धमकावल्याचेही मस्के यांनी सांगितलं आहे. सुमीतने आपल्या घरावर हल्ला केला, गाड्या फोडल्या आणि आता गाडीही पेटवली असल्यामुळे या गुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सुमित ठाकूर हा भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सुमित ठाकूरला अटक करून त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली आहे.

कोण आहे हा सुमीत ठाकूर ?
- चार खुनाचे गुन्हे दाखल
- दुहेरी खून प्रकरणात फरार
- मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल
- दोन अपहरणाचे गुन्हे
- खंडणीचे अनेक गुन्हे
- सर्व गुन्ह्यांमध्ये सध्या जामिनावर
- गेल्या 8 वर्षांपासून गुन्हेगारी जगतात
- विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
- पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांचा कार्यकर्ता
- भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्षपद
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close