सातासमुद्रापार बाबासाहेबांचं स्मारक, लंडनमधील घर आता भारताकडे !

September 25, 2015 7:37 PM0 commentsViews:

babasaheb_home25 सप्टेंबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं आता सातासमुद्रापार स्मारक उभारलं जाणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये वास्तव्यास राहिलेल्या लंडनमधलं घर आता भारत सरकारच्या मालकीचं झालंय. या घराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप काबंळे यांनी दिली आहे. 31 कोटी 29 लाख रुपयांना घराची खरेदी झाली आहे. घराचा ताबा आता भारत सरकारकडे आला आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1921-1922 असे दोन वर्षे लंडनमध्ये वास्तव्यास होते. बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण पूर्ण केलं होतं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी डी.एस.सी पदवी संपादन केली. लंडनमध्येच बाबासाहेबांनी बॅरिस्टर पदवीही मिळवली. या काळात बाबासाहेबांनी लंडनमधील किंग हेनरी रोड येथील एका घरात वास्तव्य केले होते. ही ऐतिहासिक वास्तू घरमालकाने 40 कोटी रुपयांत लिलावात काढली होती. याबद्दल लंडन येथील स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ही बाब लंडन इथं कार्यरत असलेल्या फेडरेशेन ऑफ आंबेडकराईट्स अँड बुद्धिस्ट ऑर्गेनायझेशन (FABU) या संघटनेच्या सदस्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने ही वास्तू विकत घेण्यासाठी हालचाल सुरू केली. याबाबत तत्कालिन राज्याचे रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत यांनी केंद्राला पत्र व्यवहार केला होता. तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही वास्तू विकत घेण्यास होकार दिला होता. या वास्तूत बाबासाहेबांचं संग्रहालय उभारण्याचा मानस सरकारने व्यक्त केला होता.

अखेर वर्षभराच्या प्रयत्नानंतर या मोहिमेला यश मिळाले आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लंडन इथं जाऊन संबंधीत व्यक्तींशी चर्चा केलीये. दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली असून आता ही ऐतिहासिक वास्तू विकत घेण्याचा सरकारने निर्णय घेतलाय.

तब्बल आठ महिन्यांच्या वाटाघाटीनंतर राज्य सरकारने हे घरं अखेर आता ताब्यात घेतलंय. एकूण 31 कोटी 29 लाख रुपयांना घराची खरेदी झाली आहे. भारतीय दूतावासाचे सरचिटणीस एन. पी . सिंग यांच्या सहीने करार झाला, आणि घरखरेदीचे सगळे व्यवहार पूर्ण झाले आहेत. आता या घराचं स्मारकात कसे रुपांतर करायचे यासाठी लवकरच समिती नेमली जाणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close