शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा विचार करा, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

September 26, 2015 4:22 PM0 commentsViews:

pawar meet cm

26 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला यवतमाळ तालुक्यातल्या आत्महत्याग्रस्त गावांना भेट दिल्यानंतर त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा विचार करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिलाय.

पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“प्रिय देवेंद्रजी,
दि. 23 सप्टेंबर रोजी पिंपरी-बुटी, भांबराजा, आणि बोधवोडन या यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त गावांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान आत्महत्या केलेल्या काही शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. चर्चेत प्रामुख्याने आत्महत्येची तीन कारणे निदर्शनास आली.
1) नापिकी 2) कर्जबाजारीपणा 3) शेती मालास योग्य बाजारभावाचा अभाव. दौर्‍यादरम्यान माझ्या निदर्शनास आलेल्या काही बाबी मी विदित करत आहे.

आत्महत्यांमागील कर्जबाजारीपणा हे एक महत्त्वाचे कारण आहे. कर्जाच्या थकबाकीमुळे वसुलीचा तगादा, नवीन पीककर्ज मिळण्यातील अडचणी यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात भारतातील अशा कर्जबाजारी शेतकर्‍यांची सुमारे 71 हजार कोटी रुपयांची कर्ज माफ झाली होती. सरकारने यावेळीही जिथे नापिकी आहे आणि शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, त्या भागात कर्जमाफीचा विचार करायला हवा.

जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडच्या शेतकरी अहवालातील मागील सुमारे 10 वर्षांतील वर्षनिहाय आकडेवारीचे अवलोकन केले असता माझ्या असे निदर्शनास आले की, आत्महत्यांचे प्रमाण ठराविक काळात वाढलेले दिसते. साधारणपणे हा काळ ऑगस्ट ते ऑक्टोबर-नोव्हेंबर असा आहे. या काळात पीक न उगवणे, उगवलेले हातचे पीक पावसाअभावी नष्ट होणे, ऐन सणासुदीच्या काळात कर्जाचा भार डोक्यावर असणे, यांसारखी प्राथमिक कारणे वाटत असली तरी अधिक खोलात जाऊन कारणे शोधावी लागतील.

आपला शरद पवार”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close