मराठवाड्यातलं भयान वास्तव! शेतमजुरांवर भीक मागण्याची वेळ

September 29, 2015 7:54 PM0 commentsViews:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

29 सप्टेंबर : महाराष्ट्रासह मराठवाड्यात आठवडाभरापूर्वी चांगला पाऊस झाला, मात्र या पावसामुळे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती खूप बदलली असं अजिबात नाही बरं… आजही ग्रामीण भागात रोजीरोटीसाठी वणवण भटकंती सुरूच आहे. पावसामुळे फसवी हिरवळ दिसत आहे. काही ठिकाणी पाण्याचे साठेही वाढलेत. पण खरीपाचं हातचं गेल्यानं शेतमजुरांच्या हाताला कामच नाही आहे. काही शेतमजुरांवर तर उपाशी राहण्याची वेळ आलीय.

asasrhahsy

मराठवाड्यात परतीच्या पावसानं चांगली हजेरी लावली. नदी-नाले तुडुंब भरून वाहिले. एकदाचा पाऊस पडल्याने प्रशासनही सुस्तावलं. पण या पावसाने मराठवाड्यातला दुष्काळ खरंच हटलाय का, तर अजिबात नाही. कारण तिथल्या शेतमुजरांच्या हाताला कामच नाही. आता मीना छडीदार या विधवा शेतमजूर महिलेचंच उदाहरण घ्याना. तिच्या डोळ्यातले अश्रू खूप काही सांगून जातायत. मीनाचे पती चार वर्षांपूर्वी आजारपणामुळे वारले. मीनाला चार मुलं आहेत. मात्र, पालनपोषण होणार नाही म्हणून त्यांनी दोन मुलं नातेवाईकांकडे ठेवली आहेत. पण हाताला काम नसल्याने उर्वरित दोन मुलांनाही त्या पोटभर जेवू घालू शकत नाहीत.

जनाबाईंची व्यथा तर खूपच भयानक आहे. पतीसोबतच तिन्ही मुलं अपंग आहेत. जनाबाई घरातली एकटीच कमावती. सगळ्यांचीच जबाबदारी तिच्यावर पडलेली. कामाला जायचं की पती आणि मुलांचं बघायचं. यातच तिची पुरती दमछाक होते. अशातच हाताला काम नसल्यानं मग जगायचं तरी कसं? असा प्रश्न तिला पडलाय.

मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे परिस्थिती फारसी बदलली नाही. मात्र शेतकर्‍यांना येणार्‍या मदतीचा ओघ कमी झाला. आजही दुष्काळी भागात पावसामुळे हिरवळ दिसत असली तरी ती फसवी आहे. पाऊस पडल्यानंतर रोजगार हमीवरची कामं देखील बंद पडली आहे. त्यामुळे जनाबाई आणि मीनासारख्या शेतमजुरांनी जगायचं तरी कसं? याचं उत्तर प्रशासनाने दिलंच पाहिजे. कारण इतरांप्रमाणे या शेतमजूर महिला रोजगारासाठी गाव सोडून शहराकडेही जाऊ शकत नाहीत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close