11/7 बॉम्बस्फोट प्रकरणी 5 दोषींना फाशी, 7 जणांना जन्मठेप

September 30, 2015 1:10 PM0 commentsViews:

11 7 mumbai local blast30 सप्टेंबर : अखेर 9 वर्षांनंतर 7/11मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आज निकाल लागलाय. याप्रकरणातल्या 12 दोषींपैकी 5 दोषींना फाशी तर 7 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. यात कमाल अन्सारी, एहेतेशाम सिद्दीकी,मोहम्मद शेख आसिफ खान आणि नावेद खान या पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागणार असं दोषींच्या नातेवाईकांनी सांगितलं.

2006 साली झालेल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी 12 दोषींच्या शिक्षेवर विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी 12 आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलंय. तर एकाची निर्दोष सुटका करण्यात आलीय. सरकारी पक्षानं 8 आरोपींसाठी फाशीची तर 4 आरोपींसाठी जन्मठेपेची मागणी केली होती. विशेष कोर्टाने आपला निकाल देत सरकारी वकिलांच्या मागणीनुसार 8 दोषींपैकी 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली. तर इतर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दिकी,मोहम्मद शेख,आसिफ खान आणि नावेद खान या पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावलीये.

9 वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेतल्या 7 लोकलमध्ये प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवून अतिरेक्यांनी स्फोट घडवला होता. लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात हे स्फोट झाले होते. यात 189 निष्पापांचा जीव गेला होता. तर 824 जण जखमी झाले होते. 11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेत 10 मिनिटांच्या अंतरात हे स्फोट झाले होते. मुंबईतल्या खार रोड-सांताक्रूझ दरम्यान पहिला, तर वांद्रे-खार रोडदरम्यान दुसरा, बाँबस्फोट झाला. जोगेश्वरीला तिसरा आणि माहिम जंक्शनदरम्यान चौथा बॉम्बस्फोट झाला. मीरा रोड ते भाईंदरदरम्यान पाचवा तर माटुंगा रोड ते माहिमदरम्यान सहावा बॉम्बस्फोट झाला. तर बोरिवलीला सातवा स्फोट झाला होता. तब्बल 9 वर्षं लांबलेल्या या खटल्याचा अखेर निकाल लागलाय. दोषींच्या फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी माजिद मेमन यांनी केली आहे. तर माजी एटीएस प्रमुख के.पी. रघुवंशी यांनी कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close