अर्थमंत्र्यांकडून 1600 कोटींची पाकीटमारी, सेनेचं शरसंधान

October 2, 2015 9:20 AM0 commentsViews:

sena on mungantiwar02 ऑक्टोबर : सर्वसामान्यांवर 1600 कोटींचा करभार लादून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी पाकीटमारी केली आहे अशी विखारी टीका शिवसेनेनं ‘सामना’मधून केलीये. तसंच दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या नजरा पंतप्रधान मोदींकडे लागून राहिल्या आहेत. मोदी यांची कृपादृष्टी आक्रोश करणार्‍या महाराष्ट्राकडे वळेल अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधान, महाराष्ट्राचा भार हलका करा अशी साद घातलीये.

सामान्यांवर कराचा बोजा टाकण्यावरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’मध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलीय. “आपल्या अर्थव्यवस्थेचे नेमके वर्णन एका शब्दात करता येईल. तो शब्द म्हणजे पाकीटमारी. याच्या खिशात हात घालून थोडे त्याच्या खिशात घालायचे आणि त्यातलाच माल हपापा करून राज्याच्या तिजोरीत टाकायचा. हे सर्व करून घेण्यासाठी राज्याला आणि देशाला अर्थमंत्र्याची खरेच गरज आहे काय? असा सवालच सेनेनं या निमित्ताने उपस्थित केलाय.

मदतीसाठी पुढे यावं !

तसंच दुष्काळग्रस्तांसाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षय कुमार यांच्यासारख्यांनी आपल्या घामाची मोठी कमाई दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांसाठी वळवली. या सामाजिक जाणिवेबद्दल आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करीत आहोत. असं सांगत मुंबईतील अहिंसावादी दयावान लोकही आपल्या संपत्तीतले थोडेफार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी अशी आशाही व्यक्त केली.

पंतप्रधान, महाराष्ट्राचा भार हलका करा!

महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मायबाप केंद्र सरकार नक्की कोणती भूमिका वठवत आहे तेसुद्धा मुख्यमंत्री फडणविसांनी जाहीर करावे. संकटग्रस्त बिहारचे दु:खदर्द समजून घेऊन पंतप्रधान मोदी यांनी सव्वा लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. बिहारच्या दु:ख निवारणासाठी देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका त्यांच्या ममत्वाची साक्ष आहे. त्यामुळे हेच ममत्व महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देईल. याच ममतेचा पाऊस महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांवर बरसेल व कोरडी जमीन सुखावेल. दुष्काळ निवारणासाठी लाख-सव्वा लाख कोटी नकोत; पण पाच-पंचवीस हजार कोटींचे एखादे पॅकेज मिळाले तरी पुरे होईल. मुंबईतून वर्षाकाठी दीड-पावणेदोन लाख कोटी केंद्राच्या तिजोरीत जात आहेत. त्यातले पाच-पंचवीस हजार कोटींचे दान परत करावे व महाराष्ट्रावर कोसळलेल्या अस्मानी संकटास सुलतानी टेकू लावून संकटाचा डोंगर दूर करावा ही माफक अपेक्षा महाराष्ट्राची आहे अशी मागणीही सेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close