परतीच्या पावसाचा तडाखा, मराठवाड्यात वीज कोसळून 30 ठार

October 3, 2015 7:30 PM0 commentsViews:

rainstrom403 ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसाचा कहर सुरुच आहे. मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यात अनेक भागात विजाच्या कडकडाटासह पाऊस कोसळतोय. मराठवाड्यात तीन दिवसांत वीज पडून 30 जणांचा मृत्यू झालाय. परभणीत एकाच दिवशी चार तर नागपूर जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू झालाय. तर अहमदनगरमध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला.

आजही संपूर्ण मराठवाड्यात ढगाळ वातावरण होतं. आजही औरंगाबादला पावसानं तासभर झोडपलं. आज झालेल्या घटनेत परभणीच्या पाथरी तालुक्यात विज कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये एक महिला, दोन मुलीचा समावेश आहे. एकट्या परभणीतचं अशा घटनेत ठार झालेल्यांची संख्या 8 झाली आहे. दुसरीकडे औरंगाबादमध्ये दोन दिवसात जवळपास 32 मिमी पावसाची नोंद झालीये. आज रात्रीतून मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.

अहमदनगरमध्ये तिघांचा मृत्यू

अहमदनगरमध्ये आज दुसर्‍या दिवशीही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. जामखेड तालुक्यातील देवदैठण मधील अचानक वादळासह पाऊस सुरू झाला. यावेळी शेतातपेरणी करत असताना मैजाबाई बबन महारनवर, बबन म्हल्लारी महारनवर हे पती पत्नी आणि पुतण्या दत्ता अकुंश महारनवर यांचा अंगार वीज पडून जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या ठिकाणी नायब तहसीलदार राजेंद्र दराडे यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.

मुंबईकरांची उकाड्यापासून गारेगार दिलासा

परतीच्या पावसानं मुंबईमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. अचानक संध्याकाळनंतर मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली. गेल्या अर्धा ते एक तास मुंबईत संततधार सुरू आहे. उकाड्यापासून हैराण होणार्‍या मुंबईकरांना परतीच्या पावसाने दिलासा दिलाय.

10 विहिरी गाडल्या

पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जवळपास तीन ते चार तास झालेल्या जोरदार पावसामुळे रेटवडी गावाचा जरेवाडी येथील पाझर तलाव भरून वाहू लागला. तलावात मोठा पाणीसाठा झाल्याने आणि तलावाचा सांडावा अपुरा
पडल्याने तलाव सांडव्याजवळ फुटल्याने कांद्याच्या शेतीचे मोठे नुकसान झालंय. जरेवाडीत झालेल्या जोरदार पावसामुळे जवळपास 10 विहिरी गाडल्या गेल्या. तर 200 एकरपेक्षा जास्त कांद्याचं पिक तलाव फुटल्याने त्यात आलेल्या दगड मातीमुळे गाडलं गेलं. पाचशे एकरपेक्षा जास्त नगदी पिकांचं नुकसान झालंय. तलावाच्या खाली असलेल्या ओढ्यावरील अनेक वीज मोटारींचे नुकसान झालं. तर रेटवडी गावठाणात जाणारा रस्ता वाहून गेला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close