बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड

October 4, 2015 2:44 PM0 commentsViews:

Shashank Manohar, president of the Board

04 ऑक्टोबर : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सभेत मनोहर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या या सभेला बोर्डाचे सदस्य आणि पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर शशांक मनोहर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

अध्यक्षपदासाठी शनिवारी मनोहर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तेव्हाच त्यांची निवड निश्चित समजण्यात आली होती. मनोहर यांना पूर्व विभागातल्या सहाही संघटनांचा पाठिंबा मिळाला होता.

पेशानं वकील असलेले मनोहर हे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. 2008 ते 2011 या कालावधीत मनोहर यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. स्वच्छ प्रतिमेचे, शिस्तप्रिय प्रशासक आणि भ्रष्टाचारावर कडक भूमिका घेणारे अशी मनोहर यांची ओळख आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर प्रमुखपदाची जागा रिक्त झाली आहे.

दरम्यान, सरकारी तपास यंत्रणेची मदत घेऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई सुरू करणार असल्याचं बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितलं. बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता आणणार असून प्रत्येक आर्थिक वर्षातील बॅलेन्स शीट बीसीसीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शशांक मनोहर यांची सेकंड इनिंग

  • शशांक मनोहर पेशानं वकील आहेत
  • 1996मध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
  • 2008मध्ये पहिल्यांदा बीसीसीआय अध्यक्ष
  • 2008 ते 2011 बीसीसीआयचे अध्यक्ष
  • कठोर निर्णय घेण्यासाठी ख्याती
  • शरद पवार यांचे निकटवर्तीय
  • अत्यंत साधारण राहणीमान
  • मोबाईल फोनही वापरत नाहीत
  • 2008मध्ये पहिल्यांदा परदेशवारी

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close