कल्याण-डोंबिवली ‘निवडणूक पॅकेज’चं वक्तव्य मुख्यमंत्र्यांना भोवणार ?

October 5, 2015 1:27 PM0 commentsViews:

CM KDMC

05 ऑक्टोबर : निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना प्रलोभने दाखवता येणार नाहीत, असं स्पष्ट करत मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेल्या साडेसहा हजार कोटी रुपयांच्या ‘निवडणूक पॅकेज’बाबत चौकशीची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला असून, निवडणूक आयोगाकडे सोमवारी तक्रार दाखल केली जाईल, अशी माहिती त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली होती.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शनिवारी आयोजित केलेल्या विकास परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांच्या कामांचा विकास आराखडा जाहीर केला.’कल्याण-डोंबिवली स्मार्ट आणि सेफसिटी बनवायचीय, अशी घोषणाही त्यांनी केली.
राज्याच्या तिजोरीतून निधी देऊन असा ‘पॅकेज’ जाहीर करणं, हे भाजपला निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा हा भंग असल्याचे विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी सांगितलं.

काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी कल्याण इथल्या महापालिका आयुक्तांकडे तक्रार करतील आणि आपण मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रारीचे निवेदन सादर करणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आयबीएन-लोकमतला सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close