पुरावा मिळाल्यावरच सनातनवर बंदी – मुख्यमंत्री

October 8, 2015 8:36 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर : सनातन विरोधात काही ठोस पुरावे मिळाले तर निश्चितपणे त्यांच्यावर बंदी घातली जाईल. पण पुरावेच नसतील तर कुणीतरी दबाव आणतंय म्हणून कारवाई करणार नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखत दिलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातनला क्लीन चिट दिलेली नसून या प्रकरणाचा पूर्ण छडा लावू, असं आश्‍वासनही मुख्यंमत्र्यांनी दिलं आहे.

राज्यातील सेना-भाजप सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी राज्याच्या विविध भागांना भेडसावणार्‍या प्रश्नांना थेट उत्तरं दिली. नागपूरची गुन्हेगारी, पुण्याचा विकास आराखडा, पुण्याची मेट्रो यासह राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तरं दिली.

नागपूरात वाढणार्‍या गुन्ह्यांविषयी मुख्यमंत्र्यांचा सावध पवित्रा दिसला. नागपूर हे क्राईम कॅ पिटल वगैर नाही. मात्र मी नागपूरचा आहे आणि गृहमंत्रालय माझ्याकडे आहे म्हणून अशा घटना उतावीळपणे दाखवल्या जातात, अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली. तर मराठवाड्याच्या पाण्याबाबत आतापर्यंत आघाडी सरकारने लबाडी केलीय आणि आमचं सरकार ते खपवून घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

त्याचबरोबर, पुणे मेट्रोच्या रखडलेल्या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता पुणे हे विचारवंतांचं शहर असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी खोचक टोमणा मारला. तर सिंचन घोटाळ्यात बड्या राजकारण्यांची नावं आली आहेत. अनेक अधिकारी या घोटाळ्यात गुंतलेले आहेत. लाचलुचपत विभागानं याची चौकशीही केली पण त्यांच्यावर होणारी कारवाई ही संथगतीनं होत असल्याचं दिसतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close