बाबासाहेबांच्या स्मारकावरुनही सेना-भाजप आमनेसामने !

October 10, 2015 9:31 PM0 commentsViews:

विवेक कुलकर्णी, मुंबई

10 ऑक्टोबर : गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेची युती तुटली. पुन्हा दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आले खरे, पण दोन्ही पक्षांमध्ये कायम शाब्दिक चकमकी होत असतात. इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या मुद्दयावरुन दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.uddhav-on-fadnavis

युतीतले वादविवाद

25 सप्टेंबर 2014: 25 वर्षांची सेना-भाजप युती तुटली

19 ऑक्टोबर 2014: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर
भाजप: 122 जागा
शिवसेना: 63 जागा

31 ऑक्टोबर 2014: देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी

5 डिसेंबर 2014: मोठ्या वाटाघाटींनंतर शिवसेना मंत्र्यांचा शपथविधी

11 ऑक्टोबर 2015: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनावर शिवसेनेचा बहिष्कार

शिवसेना आणि भाजप…देशातली सगळ्यात जास्त काळ असणारी युती असं या दोन्ही पक्षांचे नेते नेहमीच अभिमानानं सांगायचे…पण
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं आणि अभेद्य वाटणार्‍या या युतीला ग्रहण लागलं. इंदू मिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमंत्रणाच्या मुद्दावरुन हे पक्ष पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले आहे. या कार्यक्रमाला शिवेसेनेला टाळलं जातंय असं शिवसेनेला वाटतं. म्हणूनच उद्धव ठाकरे 11 ऑक्टोबरला भूमिपूजनाच्या दिवशी बीड इथं दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. ही श्रेयाची लढाई नाही असंही ते म्हणाले. पण,इंदू मिलवर होणारा कार्यक्रम हा भाजपचा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आदित्य विसरलेले नाहीत.

इतर नेत्यांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला निमंत्रित केलं असल्याचं सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचं वक्तव्य सेना नेतृत्वाला चांगलंच झोंबलंय. एकीकडे सेना नेते आपला राग व्यक्त करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आमच्यात मतभेद आहेत पण भांडणं नाहीयेत. आम्ही पाच वर्षं यशस्वीपणे कारभार करू असं मुत्सद्देगिरीपूर्ण उत्तर दिलंय.

शिवसेना आणि भाजप यांचं सरकारमध्ये एकत्र असण्याचं एकमेव कारण म्हणजे सत्तेत राहायचं असल्यानं असलेली अपरिहार्यता…यापुढे दोन्ही पक्षांचं लक्ष्य असणार ते मुंबई महानगरपालिका…शिवसेनेला पालिकेवरची आपली सत्ता कायम ठेवायचीय तर भाजपला त्यावर ताबा मिळवून राज्यात सगळीकडे वर्चस्व सिद्ध करायचंय. त्यामुळे या संघर्षाचे पडसाद पुढच्या काळात उमटत राहतील हे निश्चित…या सगळ्या प्रकारेमुळे यातला राजकारणाचा भाग सोडला तर डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाबाबत शिवसेनेची अनास्था आहे की काय असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close